चांगले रील्स तयार करण्याच्या ट्रिक्स

नाशिक : दीपिका वाघ

डिजिइन्फो

इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर रील्स आवडीने बघितले जातात. एकदा रील्स बघायला सुरुवात केल्यानंतर मिनिटांचे तास कधी होऊन जातात ते कळत नाही. रील्सच्या माध्यमातून कमाई करता येते म्हणून रील्स हे पैसे कमावण्याचे उत्तम साधन मानले जाते. फक्त त्यासाठी रील्समध्ये वेगळेपण असले पाहिजे. मनोरंजनपर किंवा माहितीपर रील्स असले पाहिजे. भारतात टिकटॉक बॅन झाल्यावर २०१९ मध्ये फेसबुकने इन्स्टाग्राम रील्सची सुरुवात केली. तेव्हा रील्स फक्त काही देशांमध्ये रीलीज झाले होते परंतु २०२० मध्ये फेसबुकने इन्स्टाग्राम रील सर्वांसाठी पूर्णपणे खुले केले. रील्सचा कंटेंट चांगला असेल, तर फॉलोअर्स, लाइक, कमेंट येतात. चांगले रील्स तयार करण्याच्या खास टिप्स..
नवीन असणाऱ्यांसाठी

इन्स्टाग्राम अकाउंटवर लॉग इन करावे. त्यानंतर प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करावे. सर्वात वर आयकॉन असेल, त्यावर क्लिक करावे. तिथे क्रिएट रील पर्यायवर क्लिक करावे. खाली कॅमेऱ्याचा पर्याय असेल, त्यावर क्लिक करावे आणि व्हिडिओ तयार करायला सुरुवात करावी. स्क्रीनवर दिलेल्या टूलच्या मदतीने व्हिडिओ एडिट करता येतो, क्रॉप करता येतो, व्हिडिओला इफेक्ट देता येतो. व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर, अपलोड पर्यायावर क्लिक करावे. अशा प्रकारे इन्स्टाग्राम रील तयार…

रील तयार करण्यासाठी कोणताही स्मार्टफोन चालतो. कमी मेगा पिक्सल कॅमेरा असला, तरी व्हिडिओ ब्लर होता कामा नये. व्हिडिओ शूट करताना माइक चांगला असावा कारण व्हिडिओ कितीही चांगला असला, तरी त्याला चांगला ऑडिओ नसला, तर त्याचा इम्पॅक्ट पडत नाही. त्यामुळे माइक चांगला असावा. शक्यतो व्हिडिओ दिवसा शूट करावा.
रीलमधून फॉलोअर्स वाढवून पैसे कमावण्यासाठी…

एक विशिष्ट विषय निवडून रील तयार करावे. फूड, टूरिझम, डान्स, कॉमेडी, काही टिप्स, हेल्थ, मनी मॅनेजमेंट, स्वत: तयार केलेले कोट्स त्याला स्वत:च्या आवाजात रेकॉर्ड करून अपलोड करता येतात. विशिष्ट विषयामुळे ती तुमची खासियत बनते. एकदा विषयाची निवड झाल्यावर नवीन असताना आठवड्यातून किमान एक व्हिडिओ तयार केला, तरी चालतो. मिळालेल्या लाइक्सनुसार त्यावर काम करून बदल करता येतात. शिवाय मार्केट ट्रेंड फॉलो करावा.
व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हॅशटॅग वापरा. व्हिडिओदेखील वापरकर्त्याच्या आवडीनुसार सर्चमध्ये दिसू लागतात. हॅशटॅगसाठी इंटरनेटची मदत घेऊ शकता. गुगलमध्ये व्हिडिओच्या विषयानुसार हॅशटॅग शोधू शकता आणि व्हिडिओमध्ये ट्रेंडिंग हॅशटॅग जोडू शकता.

कंटेट चांगला असेल, फॉलोअर्सची संख्या वाढली असेल, तर काही ब्रॅण्ड तुम्हाला त्यांच्या ब्रॅण्डची जाहिरात करायला सांगतात. त्या मोबदल्यात तुम्हाला पैसे दिले जातात. फॉलोअर्स जास्त असतील, तर स्पॉन्सरसाठी तुम्हाला ऑफर मिळतात. १० हजार फॉलोअर्स झाल्यानंतर रील्समधून कमाई करता येते.
इन्स्टाग्रामवर ९० ते ६० सेकंदांसाठी रील्स रेकॉर्ड करता येतो. यूजर्सला इन्स्टाग्राम रीलमध्ये स्टिकर्स मिळतात जे आतापर्यंत फक्त इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये उपलब्ध होते. यात, वापरकर्ते स्वतःच्या आवाजात ऑडिओ रील जोडू शकतात.

इंटरनेटवर अनेक प्लॅटफॉर्मवर रीलची संख्या अधिक असल्याने पाच सेकंदांत तुमचा व्हिडिओ बघणाऱ्याला इम्प्रेस करणारा असावा, नाही तर स्वाइपचा पर्याय त्यांच्याकडे असतो. त्यासाठी वेळेचे गणित जमायला हवे.

——-०——–

The post चांगले रील्स तयार करण्याच्या ट्रिक्स appeared first on पुढारी.