जयंत पाटील यांच्या निलंबन कारवाई विरोधात धुळ्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

धुळे

धुळे : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटलांच्या निलंबनाविरोधात धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून हुकूमशाही पद्धतीने हे निलंबन केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. निलंबन मागे न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.

धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विधानसभेतील निलंबनाविरोधामध्ये आंदोलन करून जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन त्यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त करण्यात आल्या. नागपूर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विधानसभेच्या अधिवेशन दरम्यान काही कारण नसताना भाजप शिंदे सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना निलंबित केले. कारण नसताना निलंबन करणे हे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे आहे. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला विधानसभेमध्ये आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. निलंबन करून भाजप शिंदे सरकारने एक प्रकारे लोकशाही ऐवजी हुकूमशाही सुरू केलेली आहे. जनतेचे विहित मुद्द्यावरील ध्यान भरकटण्यासाठी हे निलंबन करण्यात आले असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला.

निलंबन त्वरित मागे घ्यावे अशी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागणी केली आहे. यावेळेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करून घोषणाबाजी करून भाजप व शिंदे सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळेस धुळे ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष सुरेश सोनवणे, शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले, किरण शिंदे, नरेंद्र मराठे, दिनेश मोरे, राजू चौधरी, किरण पाटील, कुणाल पवार, रामेश्वर साबळे, महेंद्र शिरसाट, राजेंद्र चितोडकर, मंगेश जगताप, दिपक देसले, सरोज कदम, उमेश महाले, स्वामिनी पारखे, जितू पाटील, संजय माळी, सतिष पाटील, युवराज बागूल, आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post जयंत पाटील यांच्या निलंबन कारवाई विरोधात धुळ्यात राष्ट्रवादीचे आंदोलन appeared first on पुढारी.