Site icon

जलजीवन, घरकुल केवळ ठेकेदारांना पोसण्यासाठीच; अजित पवार यांची टीका

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशन ठेकेदारांच्या सोयीसाठी चालविलेली योजना असून मोठ्या प्रमाणावर यात भ्रष्टाचार आहे. घरकुलाबाबतही प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने खरे लाभार्थी वंचित राहताहेत. शिवाय, मागील दोन वर्षात नंदूरबार जिल्ह्यात सुमारे दीड हजारांहून बालमृत्यू व मातामृत्यू झाले आहेत. देश अमृत महोत्सवी वर्ष तर नंदुरबार जिल्हा निर्मितीची रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करत असतांना येथील अशा अनेक समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत, असा घणघात करीत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना जोमाने एकत्रित लढण्याचे आवाहन केले.

विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि माजी मंत्री जयंत पाटील हे आज नंदुरबार दौऱ्यावर आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आणि विविध कार्यक्रम व भेटीगाठी असे या दौऱ्याचे स्वरूप होते. शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेऊन अजित पवार यांनी चर्चा केली. ही या दौऱ्यादरम्यानची विशेष राजकीय घटना ठरली.

डॉ. अभिजीत मोरे यांचे अजित पवारांकडून  कौतुक

दरम्यान व्हीजी लॉन येथे दुपारी पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटचालीवर समाधान व्यक्त केले. जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थिती असतांना पक्ष संघटनासाठी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे करीत असलेल्या कामाचे कौतूकही केले.

अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहीजेत. येत्या निवडणूकांमध्ये महाविकास आघाडीत देखील एकी ठेवावी लागणार आहे. यासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. देशात राष्ट्रीय नेत्यांना धमकी दिली जाते तर सर्वसामान्यांचे काय? देशात व राज्यात नेमके काय सुरु आहे? असा सवाल उपस्थित करत कायदा आणि सुव्यवस्थेवर ताशेरे ओढले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारपणे वागण्याचेही आवाहन अजित पवार यांनी केले.

नंदुरबार जिल्ह्यात एक वेळ राष्ट्रवादीची मजबूत स्थिती होती. मात्र उलथापालथी होतात. यातूनच नवीन कार्यकर्ते तयार होत असून त्यांना संधी मिळाल्यास ते विकासाचा ध्यास घेतात. जिल्ह्यात राष्ट्रवादीची फळी मजबूत करण्यासाठी प्रत्येक गावागावात बुथ कमिट्या तयार करुन सरकारच्या ज्या योजना दुर्गम भागात पोहचत नाहीत त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गावागावात पोहचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहीजेत. मध्यंतरीच्या निवडणूकांमध्ये काही जागा निवडून आल्या असल्या तरी त्यावर समाधान न मानता आणखी काम करण्याची संधी आहे, असेही अजित पवार म्हणाले.

हेही वाचलंत का?

The post जलजीवन, घरकुल केवळ ठेकेदारांना पोसण्यासाठीच; अजित पवार यांची टीका appeared first on पुढारी.

Exit mobile version