जळगावच्या जैन फार्म फ्रेश फुड्सचा ‘इंडिया ॲग्रीबिझनेस अवॉर्ड्स’ ने सन्मान

DEHLI www.pudhari.news

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

भारतीय अन्न आणि कृषी परिषद (ICFA) यांच्यावतीने नवी दिल्ली येथे देशातील सर्वात मोठे कृषी संमेलन ‘ॲग्रोवर्ल्ड-2022’ पार पडले. यामध्ये अन्न प्रक्रिया श्रेणी करीता जैन फार्म फ्रेश फुडस् लिमिटेडला ‘इंडिया ॲग्रीबिझनेस अवॉर्ड्स 2022’ ने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री डॉ. संजीव कुमार बलियान यांच्या हस्ते कंपनीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी.के. यादव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नवी दिल्ली येथे आयोजित प्रदर्शन कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील झाले. त्यात शाश्वत शेतीचे तंत्र, काढणीनंतरचे व्यवस्थापन, प्रक्रिया आणि विपणन, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी परिवर्तन, शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी व्यापार, ई-कॉमर्सद्वारे शेतकऱ्यांचे सक्षमीकरण: एफपीओची भूमिका इत्यादी विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. जैन फार्म फ्रेश फुडस् लि. चे कार्य अधोरेखित करून अन्न प्रक्रिया श्रेणीमधून ‘इंडियन ॲग्रीबिझनेस अवॉर्डस् 2022’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जगातील सर्वांत मोठ्या प्रमाणावर आंब्यावर प्रक्रिया करणारी नंबर एकची तर कांदा भाजीपाला निर्जलीकरण करणारी सर्वात मोठी कंपनी म्हणून जैन फार्म फ्रेश फुडस् लिमिटेडची ओळख आहे. या कंपनीचे वार्षिक जागतिक उत्पन्न 1600 ते 1800 कोटी रुपये आहे. गेल्या पाच वर्षात 8 हजार मेट्रीक टनांहून अधिक कांद्यावर प्रक्रिया केली गेली. त्यासाठी एकूण नऊ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडून माल खरेदी करून प्रक्रिया केलेली आहे.

हेही वाचा:

The post जळगावच्या जैन फार्म फ्रेश फुड्सचा 'इंडिया ॲग्रीबिझनेस अवॉर्ड्स' ने सन्मान appeared first on पुढारी.