जळगाव : आजारपणाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

गेल्या १० वर्षांपासून आजारपण आणि आर्थिक विवंचनेला कंटाळून बामणोद (ता. यावल) येथील शेतकरी दाम्पत्याने तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. भुसावळ शहरातील तापी पात्रात दोघांचे मृतदेह तरंगताना दिसून आले. वसंत वासुदेव नेमाडे (६३), मालतीबाई वसंत नेमाडे (५५) अशी दोघांची नावे आहेत. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ शहरातील तापी नदीपात्रात दोन मृतदेह तरंगताना आढळल्यानंतर स्थानिक पोहणार्‍यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या तपासात दोन्ही मृतदेह बामणोद येथील दाम्पत्याचे असल्याचे स्पष्ट झाले. मालतीबाई या गेल्या १० वर्षांपासून आजारी होत्या. घरची परिस्थिती बेताची असून, या परिवाराने आपली शेती निम्म्या भागीदारीने कसण्यासाठी दिली आहे. तसेच मुलगा आणि सून हे दोन्हीही डॉ. उल्हास पाटील महाविद्यालय व रुग्णालयात रोजंदारीवर काम करतात. शिवाय वसंत नेमाडे यांच्याकडूनही वृद्धापकाळामुळे काम होत नव्हते. परिणामी, त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. अशा परिस्थितीला कंटाळून या दाम्पत्याने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. भुसावळातील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : आजारपणाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या appeared first on पुढारी.