जळगाव : आ. खडसे यांच्या अडचणीत वाढ; दूधसंघ अपहारप्रकरणी गुन्हा दाखल

एकनाथ खडसे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्हा दूध संघातील अपहार प्रकरण चांगलेच तापले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. तरीही गुन्हा दाखल न झाल्याने त्यांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर मात्र पोलिसांनी भाजपच्या तक्रारीनुसार सुमारे सव्वा कोटी रुपये किंमतीचे लोणी आणि दूध पावडरच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल केल्यामुळे आमदार खडसे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे या प्रकरणात त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जळगाव शहर पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. ११ ऑक्टोबर २०२२ रोजी आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलिस अधिक्षक यांना अर्ज दिला. त्यात त्यांनी दुध संघ येथुन सुमारे १४ टन बटर (लोणी) ८ ते ९ टन म्हशीच्या दुधाची भुकटी (मिल्क पावडर) सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये मालाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली आहे. जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाचे चेअरमन, कार्यकारी संचालक काही मोजके कर्मचारी यांनी अंत्यत हुशारीने व नियोजन पद्धतीने ही विल्हेवाट लावल्याचे नमुद केले.

दुधसंघाची जबाबदारी संचालक मंडळावर…

मनोज गोपाळ लिमये (५९, रा. दुधसंघ कॅंपस, जळगाव) यांचा दि. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी जबाब नोंदविला असता त्यांचे म्हणणे आहे की, ते जळगाव सहकारी दुधसंघ येथे कार्यकरी संचालक म्हणून सन मार्च २०२२ पासून कार्यरत आहे. त्यांच्यावर संचालक मंडळाचे नियंत्रण असल्याने दुधसंघाची संपुर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे.

दुध पावडरच्या साठ्यात तफावत…

तसेच दिनांक ८ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री ९.३० वाजता मनोज लिमये यांनी संदिप झाडे, स्वप्निल जाधव, नितिन पाटील, महेंद्र केदार यांनी विक्री विभागातील प्रत्यक्ष पांढऱ्या लोण्याचा साठा तपासणीचे निर्देश दिले असता त्यांच्या तपासणीत दिनांक २ ऑक्टोबर २०२२ रोजी १४ टन पांढरे लोणी अंदाजे किंमत ७० ते ८० लाख रुपये संघाच्या बाहेर वाई (जि. सातारा) येथे शितगृहात पाठविल्याची नोंद साठा रजिस्टरमध्ये घेण्यात आली आहे. परंतु असे प्रत्यक्षात कोणतेही वाहन नमुदसाठा घेवून दुधसंघाचे बाहेर गेले नाही. याची इन व आउट गेटमध्ये नोंद देखील नाही, तरी तपासणीत दिनांक २ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेली नोंद ही खोटी असल्याचे तपासणी पथकाच्या निदर्शनास आलेले आहे. तसेच तपासणी पथकास अभिलेखानुसार ९ मॅट्रीक टन दुध पावडरची तफावत आढळुन आली आहे. त्याची कींमत अंदाजे ३० ते ३५ लाख रुपये आहे. असे एकंदरीत १ कोटी १५ लाख रुपयांचा अपहार झालेला असल्याचे मनोज लिमये यांच्या तक्रारीत नमुद आहे.

म्हणून गुन्हा दाखल….

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता, कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी या प्रकरणी ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित केले, त्यांच्या निलंबन आदेशात अपहार नमूद केल्याचे म्हटले आहे. हाच मुद्दा लक्षात घेऊन पोलिसांनी दूध संघाची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दूध संघातील जबाबदार संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : आ. खडसे यांच्या अडचणीत वाढ; दूधसंघ अपहारप्रकरणी गुन्हा दाखल appeared first on पुढारी.