जळगाव : गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून महिलेची १६ लाखांची फसवणूक

जळगाव, चोपडा : गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून चोपडा तालुक्यातील महिलेची १६ लाखात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अडावद पोलिसांत ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभा हिरालाल पाटील (वय ३८, रा.लोणी, ता.चोपडा) यांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार हरीयाणातील हिस्सारमधील फ्युचर मेकर लाईफ केअर आणि इतर कंपनीच्या नावाखाली विनोद पाटील, स्वाती रमेश जाधव, रमेश जाधव (रा.चोपडा), कल्पना बाळू पाटील, बाळू पाटील, गजानन पाटील (रा. पंचक ता.चोपडा) यांनी विश्वास संपादन करीत ३० मे २०१७ ते २०२२ पर्यंत तब्बल १६ लाख २ हजार ५०० रुपयात फसवणूक केली.

गुंतवणूकदार आकर्षिक करण्यासाठी दिली बक्षिसं…
सुरुवातीच्या काळात फ्युचर मेकर लाईफ केअर कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांना कार दिल्याचे तसेच त्यांना कंपनीने लाखो रुपये कमिशनपोटी दिल्याचे बँक स्टेटमेंट कार्यक्रमात दाखविण्यात येत होते. कंपनीच्या संचालकांनी मोठा परतावा आणि इतर लाभ देण्याचे आश्वासन दिल्याने अनेकांनी या कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती. या आमिषाला बळी पडून प्रतिभा पाटील यांनी सोनं, जमीन आणि बचत केलेली रक्कम गुंतवली होती. परंतू पैसे परत मिळत नसल्यामुळे अखेर त्यांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली. याप्रकरणी अडावद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास राजपूत करीत आहेत.

हेही वाचा :

The post जळगाव : गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून महिलेची १६ लाखांची फसवणूक appeared first on पुढारी.