जळगाव : गुलाबराव पाटलांनी अभिवादन केलेल्‍या स्मारकांचे शिवसेनेकडून शुध्दीकरण

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गटात सहभागी झालेले गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. शपविधी आटोपल्यानंतर ते आपल्या मतदारसंघात परतले. यावेळी त्यांनी धरणगाव शहरातील महापुरूषांच्या स्मारकाला अभिवादन केले होते. मात्र, शिवसेनेने याविरुध्द आक्रमक भूमिक घेत महापुरूषांच्या त्‍या स्मारकांना दुग्धाभिषेक करून शुध्दीकरण केले.

जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. मुंबईहून परतल्यानंतर गुलाबराव पाटील यांचे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणुकीद्वारे शक्तीप्रदर्शन केले होते. यानंतर आज (दि. १४) शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांना दुग्धाभिषेक करून शुध्दीकरण केले. यावेळी शिवसैनिकांनी शिंदे गटाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

राज्यात संविधानाची पायमल्ली

कोरोनाच्या काळात चांगलं काम करणाऱ्या उद्धव ठाकरेंचं जगाने आणि सुप्रीम कोर्टाने कौतुक केलं.  राज्यात बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची पायमल्ली होत आहे. या गद्दारांनी आपली निष्ठा विकली. यामुळे शिवाजी महाराजांच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही, असं शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ म्‍हणाले.

The post जळगाव : गुलाबराव पाटलांनी अभिवादन केलेल्‍या स्मारकांचे शिवसेनेकडून शुध्दीकरण appeared first on पुढारी.