जळगाव : गुलाबराव वाघ यांना मुख्यमंत्र्यांच्या ‘पीए’च्या नावाने धमकी

उस्मानाबाद

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी बंडखोर आमदारांविरुध्द आंदोलन केले होते. त्यामुळे त्यांना फोनवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पीए बोलत असल्याचे सांगून धमकी देण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणी शिवसेना आक्रमक झाली असून, संबंधित आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच वाघ यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याची मागणी धरणगाव पोलिसांकडे करण्यात आले.

याबाबत वाघ यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपण गेल्या ३५ वर्षांपासून शिवसेनेचे काम करीत आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरुध्द जिल्हाभरात आवाज उठविलेला आहे. शनिवारी २ जुलै रोजी जळगाव शिवसेनेच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. त्यावेळी दुपारी तीनच्या सुमारास मोबाईवरून फोन आला. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘पीए’ बोलत असल्याचे सांगून बंडखोर आमदारांविरुध्द एकही शब्द बोलू नको. अन्यथा तुला जीवे मारण्यात येईल, अशी धमकी दिली. याबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धमकी देणाऱ्याला तातडीने अटक करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का ?

The post जळगाव : गुलाबराव वाघ यांना मुख्यमंत्र्यांच्या 'पीए'च्या नावाने धमकी appeared first on पुढारी.