जळगाव : चोरांची मतं घेऊन संजय राऊत राज्यसभेत गेले – गुलाबराव पाटील 

गुलाबराव पाटील www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला. यावरुन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. सभागृहाला चोर म्हणायचं…. ४१ चोरांची मतं घ्यायची आणि राज्यसभेमध्ये जायचं. चोरांनी त्यांना मतं दिली, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे. संजय राऊत यांच्या या विधानावर सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांनी सभागृहात भाषण करत निषेध व्यक्त केला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील संजय राऊतांवर निशाणा साधला. ते म्हणाले, मार्मिकमधूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आक्षेपार्ह चित्र काढतात. कोणालाही डिवचायचे संजय राऊत यांनी ठेका घेतलाय का?, असा सवालही गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.

…तर खासदारकीचा राजीनामा द्या
आम्ही जनतेच्या मतांवर या सभागृहात निवडून आलो आहोत. तुमच्यासारखे मागच्या दरवाजाने निवडून आलो नाही. शिवसेनेची यांनी तर वाट लावली आणि ते आता १६ आमदारांची देखील वाट लावणार आहेत. ज्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उल्लू बनवले. ३५-३५ वर्षे तपस्या करणाऱ्या लोकांना घरातून बाहेर काढले. यांनी शिवसेनेचा सर्व सत्यानाश केला, तो माणूस आज आम्हाला चोर म्हणतोय. सभागृहाला चोर म्हणतोय. तुम्ही आमची मतं घेतली. तुम्हाला जर येवढी गरिमा राखायची असेल तर आता खासदारकीचा राजीनामा द्यावा, असं आव्हान देखील गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना दिलं आहे.

शेट्टींप्रमाणे संजय राऊतांना शिक्षा द्या
सभागृहातील एक सदस्य चार लाख लोकांमधून निवडून येतो. सभागृहातील २८८ आमदारांना आणि या सभागृहाला चोर म्हणावं, हा लोकशाहीचा, सभागृहाचा आणि जनतेनं दिलेल्या मतदानाचा अपमान आहे. अशांवर हक्कभंगाची कारवाई केली पाहिजे. विधानसभा अध्यक्षांनी हक्कभंग प्रस्ताव स्वीकारला आहे. दोन दिवसांनंतर अध्यक्ष त्यावर निर्णय घेतील. पण आमची मागणी अशी आहे की, ज्यावेळी डान्सबार बंदी कायदा आणला होता. त्यावेळी शेट्टी नावाचे व्यक्ती डान्सबारचे अध्यक्ष होते. त्यांनीही सभागृहाच्या बाबतीत अपशब्द वापरले होते. त्यांना ज्या पद्धतीची शिक्षा दिली, तशीच शिक्षा संजय राऊतांना देण्यात यावी, अशी मागणी आम्ही सभागृहात करणार आहोत,” अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली.

हेही वाचा:

The post जळगाव : चोरांची मतं घेऊन संजय राऊत राज्यसभेत गेले - गुलाबराव पाटील  appeared first on पुढारी.