Site icon

जळगाव : जामनेरात कांग नदीला पहिला पूर, अडीचशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान

जळगाव : तब्बल वीस दिवसापासून पावसाची प्रतीक्षा करीत असलेल्या जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना गणपती बाप्पा पावले. शहरात रात्री अवघ्या काही तासात ५५ मिमी पाऊस झाला. परंतु वाकडी, लोणी, मादणी, मोयखेडे दिगर परिसरात वादळासह झालेल्या पावसाने अडीचशे हेक्टरवरील मका, कापूस व केळीचे नुकसान झाले आहे.

काही भागात पावसाचे पाणी शेतात शिरल्याने पिके जमीनीवर पडून नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. रात्री झालेल्या पावसामुळे कांग नदी वाहून निघाली. यंदाच्या पावसाळ्यातील कांग नदीला आलेला हा पहिला पूर होता. खडकी नदी व लहान मोठे नाले दुथडी भरून वाहू लागले. तळेगाव, मोयखेडे दिगर, कापूसवाडी, वाघारी परिसरातील शेतात पावसाचे पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले.

सर्वाधिक पाऊस जामनेरला ५५ मिमी झाल्याची नोंद आहे. रात्री साडेआठ वाजेपासून सुरु झालेला पाऊस ११ वाजेपर्यंत सुरूच होता. महसूल विभागाकडे आलेल्या प्राथमिक अहवालानुसार पावसामुळे सुमारे २१० शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. सुमारे अडीचशे हेक्टर क्षेत्रातील कापूस, मका व केळी या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती जामनेरचे तहसीलदार प्रशांत निंबोलकर यांनी दिली.

हेही वाचा :

The post जळगाव : जामनेरात कांग नदीला पहिला पूर, अडीचशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान appeared first on पुढारी.

Exit mobile version