Site icon

जळगाव : जामनेर तालुक्यात स्कूल बसचा अपघात; ३० विद्यार्थी जखमी

जळगाव : विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगत भल्यामोठ्या झाडावर आदळली आणि त्यानंतर उलटली. शुक्रवारी (दि. ३१) सकाळी जामनेर तालुक्यातील पहूर शेंदुर्णी दरम्यान हा भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. बसमध्ये एकूण असलेल्या ४० विद्यार्थ्यांपैकी ३० विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

शेंदुर्णी येथील सरस्वती विद्या मंदिर या शाळेची एम. एच. १९ वाय ५७७८ या क्रमाकांची बस नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घेऊन विद्यालयाकडे येत होती. पहूर ते शेंदुर्णीदरम्यान घोडेश्‍वर बाबाजवळ या बसच्या खालील बाजूस असलेला पाटा तुटल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल भागात पडली. तेथे असलेल्या झाडाला बसची जोरदार धडक बसली. झाडाचे अक्षरश: तुटून दोन तुकडे झाले आणि धडक दिल्यानंतर बस उलटली.

विद्यार्थ्यांवर उपचार सुरु…

अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये सुमारे ४० विद्यार्थी आणि काही शिक्षक होते. यातील अंदाजे ३० विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाले आहेत. खासगी वाहनांनी काही जखमींना पहूर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर काहींना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

The post जळगाव : जामनेर तालुक्यात स्कूल बसचा अपघात; ३० विद्यार्थी जखमी appeared first on पुढारी.

Exit mobile version