जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटाच्या दोन नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यात शिंदे गटातील आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच  असून, एकमेकांविरुध्द ट[काटिप्पणी केली जात आहे. यात पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आ. चिमणराव पाटील यांच्यातील जुगलबंदी चांगलीच रंगली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही नेत्यांशी फोनवरून संपर्क साधून त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. तरीही हे दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत.

आमदार चिमणरावांच्या आरोपाला उत्तर देताना पालकमंत्री गुलाबराव यांनी आता पलटवार केला असून, राष्ट्रवादीशी सेटलमेंट केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Jalgaon)

राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाणी योजनांसाठी निधी दिल्याने आमदार चिमणराव पाटील हे नाराज आहेत. राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याच्या मुलासोबत गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव दिसून आले, त्यानंतर चिमणराव पाटील यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यावरूनच पुन्हा चिमणराव पाटील आणि गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली असून सध्या या दोघांमधील वाद विकोपाला गेला असल्याचे पाहायला मिळत आहे.

तेव्हा त्यांचे बळ कुठे जाते?  : गुलाबराव पाटील

चिमणराव पाटील यांनी टीका केल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी या टीकेचा समाचार घेतला आहे. एकमेकांबरोबर नारळ फोडल्याने जर पक्षाला बळ मिळत असेल तर पारोळा मार्केट कमिटीत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उमेदवारांना चिमणराव पाटील हे बिनविरोध निवडून आणतात. तेव्हा त्यांचे बळ कुठे जाते? असा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला आहे. (Jalgaon)

…तर शरद पवार, आशिष शेलारही एकत्र आले

चिमणराव पाटील यांना मीच शिवसेनेत आणले. माझ्या जुन्या मतदारसंघात ते आमदार झाले. त्यावेळी त्यांना घेऊन मी मतदार संघात फिरलो. तेव्हा मात्र कधीही आमच्यात कटूता नव्हती. चिमणरावांच्या मतदारसंघात पाणी पुरवठ्याच्या अनेक योजना मंजूर केल्या आहेत. ते परस्पर त्या योजनांचे उद्घाटन करतात. पत्रिकेवर माझं नावही टाकत नाही. प्रोटोकॉलनुसार योजना मंजूर झाल्यास त्या खात्याच्या मंत्र्याचे नाव पत्रिकेत टाकावे लागते, मात्र याबाबत मी कधीही नाराजी व्यक्त केली नाही. मी छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, राजकारणात मोठं मन ठेवावं लागते. काही दिवसांपूर्वी मिलींद नार्वेकर, शरद पवार, आशिष शेलार सगळे नेते एकाच व्यासपीठावर होते. त्यामुळे पक्ष कुठलाही असो विकास कामे करताना एकत्र येण्यास काही हरकत नाही असे गुलाबराव पाटील म्हणाले.

नेमका काय आहे वाद?

आमदार चिमणराव पाटील म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघात गुलाबराव पाटील यांनी माझ्या प्रतिस्पर्धी असलेल्या आमदाराला निधी मंजूर करून दिला. त्यांच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या मुलासोबत मंत्री गुलाबराव पाटील यांचा मुलगा प्रतापराव पाटील यांनी हजेरी लावली. हीच बाब मला खटकली. ज्यांच्यामुळे आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो, त्यांना मोठं करण्याचं काम सुरू आहे, असं म्हणत चिमणराव पाटील यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा

The post जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटाच्या दोन नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच appeared first on पुढारी.