जळगाव जिल्ह्यात बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व

जळगाव : जिल्हयात १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. यातील सहा बाजार समित्यांची आज (दि. २९) मतमोजणी करण्यात आली. दरम्यान भुसावळ, चाळीसगाव, जामनेर या तीन बाजार समितीवर भाजपाप्रणित आघाडीने विजय मिळविला. तर, रावेर आणि पारोळा या दोन बाजार समितीत महाविकास आघाडी विजयी झाली आहे. याउलट चोपडा बाजार समितीत शिंदे गट आणि मविआ यांचे समसमान प्रत्येकी ९ उमेदवार विजयी झाले आहेत.

भुसावळात एकनाथ खडसेंना धक्का  

भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे. यात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातून सत्ता आपल्याकडे ओढून घेतली. भाजप पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल विरूध्द महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनलमध्ये तगडी लढत झाली. यात आमदार संजय सावकारे यांनी भाजपच्या पॅनलचे तर आमदार एकनाथ खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांनी मविआच्या पॅनलचे नेतृत्व केले. याठिकाणी भाजपाप्रणित शेतकरी विकास पॅनलचे १५ संचालक विजयी झाले. तर ३ जागांवर महािवकास आघाडीचे उमेदवार निवडून आले असून आ. सावकारे यांनी त्यांचा मतदारसंघावरील असलेली पकड सिद्ध केली आहे.
—————
पारोळयात शिंदे गटाला झटका….

पारोळा बाजार समितीत १५ जागांवर महाविकास आघाडीचे संचालक सदस्य निवडून आले आहेत. यात शिंदे गटाचे आ.चिमणराव पाटील यांचे पुत्र अमोल पाटील यांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला आहे. बाजार समिती सभापती तथा विद्यमान जिल्हा बँक उपाध्यक्ष अमोल पाटील यांना प्रतिस्पर्धी ठाकरे गटाने नेते डॉ. हर्षल माने यांनी मविआ प्रणित पॅनलची जबाबदारी सांभाळली. मविआ प्रणीत पॅनलने १५ जागांवर विजय संपादन केला.
——–
चाळीसगाव बाजार समितीत आमदार चव्हाणांची जादू…

चाळीसगाव बाजार समितीत भाजपा प्रणीत १३ उमेदवार संचालक मंडळात निवडून आले असून पाच जागांवर महाविकास आघाडीला समाधान मानावे लागले. भाजपा प्रणित पॅनलची धुरा आ. मंगेश चव्हाण यांनी सांभाळत माजी आ. राजीव देशमुख चव्हाण यांच्यासह मविआ गटाला धक्का दिला आहे.
——
जमनेरात गिरीश महाजनांचे पॅनल विजयी…

भाजपाचे संकटमोचक समजले जाणारे वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर बाजार समितीत देखील सर्वच्या सर्व १८ जागांवर भाजपच्या पॅनलने विजय मिळविला आहे. यात महािवकास आघाडीला एकही जागा न मिळाल्याने आघाडीच्या पॅनलचा सुपडा साफ झाला आहे.
——–
रावेर तालुक्यात खासदार खडसेंना धक्का…

भाजपच्या रक्षा खडसेंच्या गटाला सुरूंग
भाजप खासदार रक्षा खडसे यांचा मतदार संघ विशेषत: केळीचे आगार असलेल्या रावेर तालुका बाजार समितीत महाविकास आघाडीने १३ जागांवर तर भाजपा प्रणित पॅनलचे तीन उमेदवार तर दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
———
चोपडा बाजार समितीत मविआ – शिंदे गट समसमान 

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ जागांपैकी ९ जागांवर शिंदे भाजपा गट विजयी झाला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी मध्ये देखील दोन गट आहेत. यातील अरूणभाई गुजराथी यांच्या गटाचे ५ तर घनश्याम अग्रवाल यांच्या गटाचे ४ असे ९ संचालक उमेदवार विजयी झाले आहेत. एकूणच चोपडा बाजार समितीत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील आणि माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या धर्मपत्नी आ.लताताई सोनवणे यांच्यासह भाजपाचे ९ सदस्य संचालक विजयी झाल्याने शिंदे गटासह मविआचे समसमान उमेदवार निवडून आले आहेत. यातून अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

The post जळगाव जिल्ह्यात बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व appeared first on पुढारी.