जळगाव : ‘ती’ ७० किमीपर्यंत नदीत वाहत गेली; साक्षात मृत्यूलाही तिने धूळ चारली…

जळगाव

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शेंगा तोडत असताना तिच्यासमोर अचानकपणे बिबट्या आला. त्यामुळे ती घाबरली आणि तिने शेजारच्या नदीत उडी मारली. तब्बल 13 तास 70 किलोमीटरपर्यंत ती वाहत गेली आणि अखेर मरणालाही वाकुली दाखवली…ही घटना आहे जळगाव जिल्ह्यातील कळंबे गावातील. लताबाई दिलीप कोळी हे तिचे नाव.

लताबाई आपल्या शेतात भुईमुगाच्या शेंगा काढत होती तेव्हा एक बिबट्या कुत्र्याचा पाठलाग करत असल्याचे पाहून तिला धडकीच भरली. तिने शेताच्या जवळच असलेल्या तापी नदीत उडी मारली. वेळ संध्याकाळची आणि पाण्याचा वेगवान प्रवाह. तिला केळीचे जाडजूड सोपट नदीत तरंगताना दिसले. तिने या सोपटाच्या दिशेने झेप घेतली आणि त्यावरच स्वार झाली. याच वेळी काही लोक तिथे गणेश विसर्जनासाठी आले एक मूर्ती चक्क तिच्या डोक्यावर कोसळली. मात्र, काळोख असल्यामुळे कोणाचीच नजर तिच्यावर गेली नाही. या सगळ्या गोंधळात तिच्या घरचे लोक काळजीत पडले होते. कारण रात्र पुढे सरकू लागली तरी ती घरी परतली नव्हती. लताबाईने सांगितले की, मी नदीतून वाहत जाताना मला एका बांध दिसला. बांधाला घट्ट पकडून स्वतःचा बचाव करायचा प्रयत्नही निष्फळ ठरला. कारण पाण्याला जबरदस्त ओढ होती. अखेर अंमळनेर येथे जेव्हा ती नदीवरील एका पुलाच्या खाली पोहोचली तेव्हा काही लोकांनी मला पाहिले आणि नदीतून त्वरेने बाहेर काढले.

The post जळगाव : 'ती' ७० किमीपर्यंत नदीत वाहत गेली; साक्षात मृत्यूलाही तिने धूळ चारली... appeared first on पुढारी.