जळगाव : दूध संघाच्या आखाड्यात विधानसभेची रंगीत तालीम

गिरीश महाजनन, एकनाथ खडसे, गुलाबराव पाटील

जळगाव : चेतन चौधरी

जळगाव जिल्ह्याचे राजकारण सध्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमुळे चांगलेच तापले आहे. मागील सात वर्षांच्या काळापासून एकनाथ खडसेंच्या ताब्यात असलेला जळगाव दूध संघ ताब्यातून घेण्यासाठी भाजप आणि शिंदे गट एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोघांकडे मंत्रिपद असूनही त्यांना जिल्हा दूध संघाची सत्ता खुणावत असल्याचे दिसून येते. यासह एकूण ७ आमदारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने दूध संघाची निवडणूक आगामी विधानसभेची रंगीत तालीम असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

दूध संघ ताब्यात घेण्यासाठी खडसे आणि गिरीश महाजन यांनी प्रतिष्ठा पणाला लावली असल्याचे पाहायला मिळत आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदार हे विरोधात उभे ठाकले असल्याने एकनाथ खडसे हे एकटे पडल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. मात्र, खडसे यांची सहकार क्षेत्रावरील पकड पाहता भाजप-शिंदे गटासाठी ही लढाई सोपी नाही. एकूणच, आजपर्यंत कोणत्याही दूध संघाची निवडणूक राजकीय आखाडा बनली नसेल, अशी जळगाव दूध संघाची निवडणूक आखाडा बनली आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघातून मंदा खडसे यांच्यासमोर आ. मंगेश चव्हाण यांचे अतिशय प्रबळ आव्हान राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आता खडसे विरुद्ध भाजप आमदार चव्हाण, असा सामना यंदाच्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत रंगणार असून, यात बाजी कोण मारणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

चोरी अपहाराचे प्रकरण नेमके काय?
राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर जळगाव दूध संघात अपहार आणि चोरीच्या घटनांबाबत पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवले गेले आहेत. या प्रकरणावरून दूध संघातील राजकारण आधीच तापले आहे. जळगाव जिल्हा दूध संघातील दूध पावडर तसेच लोणी घोटाळा प्रकरणी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दीड कोटी रुपयांच्या अपहाराची तक्रार पोलिसांत दिली होती. तर एकनाथ खडसे संचालक मंडळाच्या वतीने चोरीची तक्रार पोलिसांत नोंदविण्यात आली होती. या दोन्ही तक्रारींची दखल घेत पोलिसांनी स्वतःच या प्रकरणी अपहाराचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. या घोटाळ्यात पोलिसांनी थेट कुणाचंही नाव न घेता या घोटाळ्यासाठी जबाबदार व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटकसत्र सुरू केले. त्यामुळे वातावरण अधिकच तापले आहे.

गुलाबराव पाटलांची सहकारात एन्ट्री
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पालकमंत्री पाटील यांनी आजवर सहकारात प्रवेश केला नव्हता. मात्र, आता त्यांनी थेट दूध संघाच्या निवडणुकीत अर्ज दाखल केला आहे. दूध संघातील राजकारण आधीच तापले असून, आता स्वत: पालकमंत्र्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने रणधुमाळीला वेग आला आहे.

दिग्गजांची उमेदवारी…
दूध संघाच्या संचालकपदासाठी गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे आमदार मंगेश चव्हाण, शिंदे गट शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, आ. सतीश पाटील, माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या पत्नी छाया देवकर, मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहायक अरविंद देशमुख, महापौर जयश्री महाजन यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

महाजन-खडसेंमध्ये शाब्दिक हल्ले…
ईडी, सीडीनंतरचा वाद आता थेट एकमेकांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये वाद असला, तरी थेट आमने-सामने लढाई झालेली नव्हती. जिल्हा बँकेत खडसे विरुद्ध महाजन यांच्यातच आमने-सामने लढाई होईल, अशी शक्यता होती. मात्र, भाजपने सरसकट माघार घेतल्याने राजकीय लढाई प्रत्यक्षात झाली नाही. आता दूध संघाची निवडणूक सुरू झाल्यानंतरच महाजन आणि खडसे यांच्यात थेट एकमेकांवर शाब्दिक हल्ले चढवले जात आहेत.

हेही वाचा :

The post जळगाव : दूध संघाच्या आखाड्यात विधानसभेची रंगीत तालीम appeared first on पुढारी.