जळगाव : दूध संघ अपहार प्रकरणी पाचवा संशयीत अटकेत

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्हा दूध संघ अपहार प्रकरणातील पाचव्या संशयितास अटक करण्यात आली आहे. जास्त किमतीचे तुप अतिशय कमी किमतीत विक्री केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाखल गुन्ह्याप्रकरणी सोमवारी (दि. १४) कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली होती. (Jalgaon)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रवी मदनलाल अग्रवाल (रा. अकोला) यास अटक करण्यात आली आहे. रवी अग्रवाल याचा चॉकलेट कारखाना असल्याचे समजते. या गुन्ह्यातील चंद्रकांत मोतीराम पाटील उर्फ सी.एम.पाटील याच्या मदतीने रवी अग्रवाल यांना अखाद्य तुप खाद्य म्हणून पुरवण्याचे काम केले जात होते. त्या अखाद्य तुपापासून चॉकलेट तयार करुन बालकांच्या जिवांशी खेळ केला जात होता. दरम्यान अटकेतील सर्व संशयीतांना पाच दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. फरार चंद्रकांत पाटील याचा शोध सुरु आहे. आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक झाली असून या अटकेनंतर खळबळ माजली आहे. (Jalgaon)

चार दिवसांची पोलीस कोठडी

दूध संघातील अपहारप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह हरी रामू पाटील, किशोर काशिनाथ पाटील आणि अनिल हरिशंकर अग्रवाल यांना मंगळवारी (दि. १५) न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. फिर्यादी शैलेश मोरखडे यांचा पुरवणी जबाब आणि साक्षीदारांच्या जबाबावरून १२० ब सह इतर कलमे पोलिसांनी वाढवली आहेत. त्यामुळे एमडी मनोज लिमयेंसह इतरांवर कारवाईचा फास आवळला जाणार असल्याचे आतापर्यंतच्या पोलीस तपासातून समोर येत आहे.

अनिल अग्रवाल यांचा कबुली जबाब

अटकेतील संशयित आरोपी अनिल अग्रवाल यांनी पोलिसांना कबुली जबाब दिला. या जबाबामध्ये म्हटले आहे की, हरी पाटील यांच्या विठ्ठल रुख्मीनी एजन्सीकडून खरेदी केलेल्या बी ग्रेडचे तूप खरेदी केले. हा व्यवहार आरटीजीएस पद्धतीने झाला होता. परंतू यात मोठी तफावत असून हरी पाटील कडून घेतलेले बी ग्रेड तूप विक्रीचे बील अद्यापही तपासात सादर केले नसल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा

The post जळगाव : दूध संघ अपहार प्रकरणी पाचवा संशयीत अटकेत appeared first on पुढारी.