जळगाव : पारोळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; ३० घरांचे नुकसान

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : पारोळा तालुक्यातील करंजी बु. येथे गुरुवारी (दि. ४) मध्‍यरात्री १२ ते २ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसामुळे सुमारे ३० घरांचे नुकसान झाले आहे. आदिवासी भिल्ल परिसरात ढगफुटी सदृश्‍य पाऊस झाल्याने अनेक गरीब कुटुंब रस्त्यावर आली. तर काही घरांच्या भिंती कोसळल्याने कोंबड्या जमिनीत दाबल्या गेल्या आहेत. तर शेळ्याही जखमी झाल्याचे वृत्त आहे.

गेल्या आठ-दहा दिवसांपासून पावसाने पारोळा तालुक्यात पावसाने दडी मारली होती. ५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शहरासह तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यातच करंजी बु. येथे ढगफुटी सदृश्‍य पावसामुळे घरातील मातीच्या भिंती कोसळल्या. यामुळे घरातील संसार उपयोग वस्तू, अन्नधान्य, कपडे मातीमोल झाले. निसर्गाचा प्रकोप इतका भयानक होता की, यात गरीब वस्तीतील कोंबड्या भितींच्या मलब्याखाली दाबल्या गेल्या. तर बकऱ्याही जखमी झाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.

शेतांमध्ये साचले पाणी

पारोळा तालुक्यातील शेवगे प्रगणे भहाळ, हिवरखेडे, मुंदाणे, सोके, मुंदाने या भागात ढगफुटीसारखा पाऊस झाला. यामुळे मुंदाने गावाजवळील फरशी पुलावरून पाणी भरून नवनाथ बाबा नाल्याद्वारे पाणी करंजी गावात घुसले. करंजी गावातील बळीराम ताराचंद भील, शरद बंसीलाल भील, नंदू मोहन माळी, प्रकाश मोहन माळी, दिलीप भील, रमेश बंसीलाल भील, दत्तू महादू माळी, संजय हिम्मतराव पाटील, साहेबराव महादू पाटील, यांच्यासह बऱ्याच जणांच्या घरात आणि शेतांमध्ये पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे.

३० घरांचे नुकसान

ढगफुटी सदृश्‍य पावसामुळे परिसरातील सुमारे ३० घरांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने मात्र जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती कळताच तहसीलदार अनिल गवांदे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत गरीब वस्तीतील लोकांना दिलासा दिला. यावेळी सरपंच भैय्यासाहेब रोकडे, तलाठी प्रशांत निकम, ग्रामसेविका वैशाली पाटील, पोलीस पाटील कल्पना पाटील, ग्रामपंचायत सदस्य परिसरातील पंचनामा‌कामी सहकार्य करीत आहेत. दरम्यान, गरीब वस्तीतील कुटुंब रस्त्यावर आल्याने त्यांची जेवणाची व्यवस्था ग्रामस्थांसह सरपंच, सदस्य करीत आहेत. यावेळी माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून तहसीलदार अनिल गवांदे यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या कुटुंबांना जास्तीत जास्त मदत मिळावी; यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

हेही वाचलंत का ? 

The post जळगाव : पारोळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; ३० घरांचे नुकसान appeared first on पुढारी.