Site icon

जळगाव : बंधाऱ्यातून वाहून जाणाऱ्या तिघांना वाचवले; एकाचा शोध सुरु

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत विविध घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. आज पुन्हा नागाई-जोगाई परिसरातील बंधाऱ्यात ४ तरुण-तरुणी वाहून गेली. त्यातील तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. तर एक जणाचा शोध सुरू आहे. आज रविवार असल्याने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी काही तरुण-तरुणी गिरणा नदीवर असलेल्या कांताई बंधाऱ्यावर गेले होते. मात्र, तरुण-तरुणी पाण्यात बुडू लागल्याने त्यांना वाचविण्यासाठी इतरांनी धाव घेतली. यावेळी तिघांना वाचविण्यात यश आले आहे. तर एक तरुण अद्याप सापडलेला नाही. सध्या त्याचा शोध सुरू आहे.

जळगाव शहरातील दूध फेडरेशनजवळ राहणाऱ्या १५ ते २० वर्षीय तरुण-तरुणींचा गट आज कांताई बंधारा, नागाई-जोगाई परिसरात आले होते. पाण्यात पोहताना चौघे बुडू लागल्याने त्यांना वाचविण्यासाठी इतरांना धाव घेतली. घटनेत तिघांना वाचविण्यात यश आले असून समीक्षा विपीन शिरडुकर (वय १७), योगिता दामू पाटील (वय २०) आणि सागर दामू पाटील (वय २४) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. नयन योगेश निंबाळकर (वय १६) याचा शोध अद्याप सुरू आहे. दरम्यान, नाशिक परिसरात पाऊस पडल्याने गिरणा पात्रात पाणी वाढले आहे.

अचानक पाणी वाढल्याने घडली दुर्घटना…

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरातील दूध फेडरेशनजवळ मिथिला अपार्टमेंटमधील १० ते १५ मुले कांताई बंधारा नागाई- जोगाई मंदिर परिसरात सहलीसाठी गेली होती. यादरम्यान गिरणा नदीपात्रात पाण्याचा आनंद लुटत असताना मुसळधार पावसामुळे अचानक पाणी वाढले. यावेळी चार जण पाण्यात वाहून जात होती. सोबतच्या इतर मुलांनी समीक्षा विपीन शिरडुकर, योगिता दामू पाटील आणि सागर दामू पाटील या तिघांना ओढून पाण्यातून बाहेर काढले.

हेही वाचलंत का ? 

The post जळगाव : बंधाऱ्यातून वाहून जाणाऱ्या तिघांना वाचवले; एकाचा शोध सुरु appeared first on पुढारी.

Exit mobile version