जळगाव : भरदिवसा तरुणाची हत्या, दोन तासात तिघे आरोपी जेरबंद

जळगाव

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शहरातील शाहू नगर परिसरात भरदिवसा तरुणाच्या खुनाची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. जळकी मील ते रेल्वे ट्रॅक दरम्यान असलेल्या गटारीत या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. जवळच रक्त आणि काही दगड पडलेले असल्याने खुनाच्या संशयावरुन पोलिसांनी तपास करत दोनच तासात तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहू नगर परिसरात असणाऱ्या जळकी मीलच्या मोकळ्या मैदानाच्या बाजूला एका तरूणाचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आला. परिसरातील नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिल्याने घटनास्थळी धाव घेतली. रहीम शहा मोहम्मद शहा उर्फ रमा (वय २८, रा. गेंदालाल मील जवळ, जळगाव) असे तरुणाचे नाव आहे. हा तरुण हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. बुधवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह जळकी मीलजवळ असलेल्या गटारीत मिळून आला.

घटनास्थळी कुटुंबियांचा आक्रोश

या घटनेची माहिती मिळताच, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी मयताच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला असता, बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, रहीम शहा याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत, दुपारी त्याला तीन तरुण सोबत घेऊन गेले होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

मद्यप्राशन करुन केली हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहीम शहा हा बुधवारी २० जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याच्या तीन मित्रांसोबत शाहूनगर येथील रेल्वे रुळाजवळ झाडाखाली मद्यप्राशन करण्यासाठी बसलेले होते. यावेळी रहीम शहा याचा इतरांसोबत वाद झाला. या वादातून त्याच्या सोबतच्या तिघांनी चाकूने रहीम शहा याच्या छातीवर पोटावर वार करत त्याचा खून केला. खुन केल्यानंतर तिघेही घटनास्थळावरून पसार झाले. मयताच्या पश्चात पत्नी फरिनबी, आई रमजाबी मोहम्मद शहा, वडील, तीन मुली असा परिवार आहे. रहीम हा एकुलता एक होता.

सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपी अटकेत

शहर पोलिसांनी काही तासातच तपास चक्र फिरवून रहीम शहा याचा खून करणाऱ्या तिघांना सीसीटीव्हीच्या आधारे ताब्यात घेतले. पवन किसन लाडे उर्फ देवा (वय १९), मनोज जलाल गायकवाड (वय ४२) व विलास तुकाराम निकम (वय ३४, तिन्ही रा.गेंदालाल) असे तिघांची नावे आहेत. हे तिघेही संशयित हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहेत. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

हेही वाचा

The post जळगाव : भरदिवसा तरुणाची हत्या, दोन तासात तिघे आरोपी जेरबंद appeared first on पुढारी.