जळगाव-भुसावळदरम्यान रेल्वेची स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित

रेल्वे www.pudhari.news

जळगाव : चेतन चौधरी
मध्य रेल्वेत मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर आणि भुसावळ असे पाच विभाग असून, भुसावळ रेल्वे विभाग आणि स्थानकाला मोठे महत्त्व आहे. 24 तासांत भुसावळ रेल्वेस्थानकावरून तब्बल 135 प्रवासी गाड्या धावतात. तर एका तासात आठ ते दहा मालगड्या येथून धावतात. वेगाने रेल्वे वाहतूक होण्यासाठी जळगाव-भुसावळमधील 25 किमी अंतरासाठी स्वयंचलित सिग्नल प्रणालीचा वापर केला जात असल्याने एकपाठोपाठ सात गाड्या चालविणे शक्य झाले आहे.

सध्या बोलबाला असलेल्या डिजिटल पद्धतीचा अंमल रेल्वेत सुरू झाला आहे. बदलाच्या या प्रवाहात मध्य रेल्वेने स्वयंचलित सिग्नल प्रणालीवर भर दिला आहे. मुंबईतील लोकल गाड्या याच सिग्नल प्रणालीवर चालतात. जळगाव-भुसावळमधील 25 किमी अंतरासाठी स्वयंचलित सिग्नल प्रणाली वापर सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे भुसावळ-जळगाव दरम्यान या प्रणालीमुळे जास्त गाड्या चालविल्या जात आहेत. या प्रणालीमुळे एकापाठोपाठ सात गाड्या धावू शकतात. हे या प्रणालीचे वैशिष्ट्य आहे. या यंत्रणेसाठी 10 कोटींचा खर्च आला आहे.

कशी काम करते सिग्नल यंत्रणा?
भुसावळ रेल्वेस्थानकावरून प्रवासी वा मालगाडी पहिल्या सिग्नलवरून सुरू झाल्यानंतर पुढे येणार्‍या सिग्नलपासून स्वयंचलित सिग्नलद्वारे गाडी धावते. पूर्वी ही सिग्नल प्रणाली नसताना केवळ दोनच गाड्या चालविण्यात येत होत्या. आता भुसावळ-जळगाव दरम्यान स्वयंचलित सिग्नल प्रणाली कार्यान्वित आहे. 25 किमीच्या मार्गावर एकापाठोपाठ सात प्रवासी गाड्या व मालगाड्या चालविल्या जातात.

भुसावळ-जळगाव दरम्यान 28 स्वयंचलित सिग्नल
भुसावळ-जळगाव या 25 कि.मी. अंतरासाठी 28 स्वयंचलित सिग्नल ठेवण्यात आले आहेत. यात भुसावळ-भादली सात, भादली-जळगाव-सात आणि परत जळगाव-भादली-सात व भादली-भुसावळ-सात असे 28 स्वयंचलित सिग्नल आहेत. स्वयंचलित सिग्नल यंत्रणेमुळे भुसावळहून जळगावकडे येणार्‍या गाडीने एक किलोमीटरचे अंतर जरी पार केले, तरी दुसर्‍या गाडीसाठीचा सिग्नल आपोआप ग्रीन होऊन लोकोपायलटला गाडी पुढे नेता येते. यामुळे पाठीमागील गाडी जास्त वेळ मागे न राहता, तिलाही पुढे जाता येत आहे. विशेष म्हणजे यामुळे भुसावळ व जळगाव स्टेशनवर यार्डात गाड्या थांबून राहण्याची संख्या कमी झाली.

हेही वाचा:

The post जळगाव-भुसावळदरम्यान रेल्वेची स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित appeared first on पुढारी.