जळगाव : माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा जामीन मंजूर, ठाकरे गटाची ताकद वाढणार

न्यायालय

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

शिवसेनेचे नेते व माजीमंत्री सुरेशदादा जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून बुधवारी नियमित जामीन मंजूर झाला आहे. घरकूल घोटाळा प्रकरणी १० मार्च २०१२ मध्ये त्यांना अटक झाली होती. उच्च न्यायालयाने नियमित जामीन दिल्याने सुरेशदादा यांचा जळगाव येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुरेशदादा जैन आता जळगावतही येवू शकणार असल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.

तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या घरकूल घोटाळ्यात १० मार्च २०१२ मध्ये सुरेशदादा जैन यांना अटक झाली होती. या घोटाळ्यात शिक्षा झाल्यानंतर ते जवळपास साडेचार वर्षे तुरुंगात होते. दरम्यानच्या काळात सुरेशदादा जैन यांना सप्टेंबर २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला होता. परंतु न्यायालयाने मुंबईत राहण्याची अट घातली होती. जळगावात येण्यास त्यांना प्रतिबंध घालण्यात आला होता. दरम्यान, सुरेशदादा जैन यांनी घरकुल घोटाळ्यात नियमित जामीन मिळावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांच्यावतीने ॲड. आबाद पोंडा यांनी न्यायालयात बाजू मांडली. अखेर उच्च न्यायालयाने सुरेशदादांना नियमित जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांचा जळगावात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठाकरे गटामध्ये संचारले चैतन्य…

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शिंदे गटात गेल्याने ठाकरे गट जिल्ह्यात कमजोर झाला होता. मात्र, सुरेशदादांना जामीन मिळाल्याने ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. सुरेशदादा जैन यांना नियमीत जामीन मिळाल्याचे वृत्त येताच शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या सतरा मजली इमारतीसमोर फटाके फोडून जल्लोष केला. सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील जळगाव महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा जामीन मंजूर, ठाकरे गटाची ताकद वाढणार appeared first on पुढारी.