जळगाव : रेल्वे रूळ उतारतांना लूम तुटल्याने पाच कर्मचारी जखमी;  दुर्घटना टळली

मध्य रेल्वे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेच्या रॅक मधुन रेल्वे रुळ उतरवितांना वायर लुम तुटल्याने ५ रेल्वे कर्मचारी जखमी झाल्याची घटना आज शुक्रवार, दि. 3 घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज सकाळी पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानका दरम्यान सकाळी रेल्वे रॅक वॅगनमधुन रेल्वे रुळ उतरविण्याच्या कामास सुरुवात झाली. दरम्यान सकाळी १० वाजेच्या सुमारास रेल्वे रुळाला वायर लुमच्या साहाय्याने बांधण्यात येवुन धिम्या गतीने रुळ खाली घेत असतांनाच रेल्वे रुळ बांधलेला वायर लुम अचानक तुटला.

जखमींवर उपचार सुरू
लूम तुटल्याने त्याठिकाणी कर्तव्यावर असलेले नगरदेवळा हेडक्वार्टरचे कर्मचारी सुरेश कुमार (२८, रा. पश्चिम बंगाल), राजु कुमार (२४, रा. बिहार), रवि कुमार (२४ रा. बिहार), चेतन पाटील (३२) व रविंद्र पाटील (५७) हे जखमी झाले. घटना घडताच सुपरवायझर यांनी रुग्णवाहिकेस पाचारण केले असता, येथील रुग्णवाहिका चालक भागवत पाटील हे घटनास्थळी दाखल होवून जखमींना पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाकडून तपास सुरू
सर्व पाचही जखमींच्या हातावर भार आल्याने यातील तीन जणांना जनरल वार्डात तर उर्वरित दोन जणांना आय. सी. यु. मध्ये दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवीतहानी झाली नसली तरी हा अपघात झाला कसा ? याबाबत रेल्वे प्रशासन तपास करीत आहेत.

The post जळगाव : रेल्वे रूळ उतारतांना लूम तुटल्याने पाच कर्मचारी जखमी;  दुर्घटना टळली appeared first on पुढारी.