जळगाव : विदेशात नोकरी लावून देण्याच्या आमिषातून प्राध्यापकाला ११ लाखांना गंडा

money fraud
जळगाव : विदेशातील विद्यापीठात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत प्राध्यापकाची १० लाख ८७ हजार ४८८ रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित प्राध्यापकाने दिलेल्या फिर्यादीवरुन सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांतीलाल पितांबर राणे (४९) हे के. एल. विद्यापीठ हैद्राबाद येथे नोकरीला आहेत. जळगाव शहरातील एम. जे. महाविद्यालय परिसरातील प्रियदर्शनी अपार्टमेंट येथे त्यांचे निवासस्थान आहे. विविध देशातील विद्यापीठांमधे नोकरी मिळवून देणाऱ्या प्लेसमेंट सेंटर मधून बोलत असल्याचे सांगत काही जणांचे त्यांच्या मोबाईलवर कॉल आले होते. विविध देशांमधील विद्यापिठांमधे आम्ही नोकरी लावून देतो, असे त्यांना फोनवर बोलणाऱ्यांकडून सांगण्यात आले. चार वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरुन आलेल्या कॉलमध्ये शिल्पा असे नाव सांगणाऱ्या एका महिलेचा त्यात समावेश आहे. फोनवर बोलणाऱ्यांच्या आमिषाला बळी पडल्याने प्रा. कांतीलाल राणे यांची फसवणूक झाली. राणे यांनी वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने आमिष दाखवणाऱ्यांना पैसे खात्यातून वर्ग केले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. लिलाधर कानडे व त्यांचे सहकारी करत आहेत.

हेही वाचा :

The post जळगाव : विदेशात नोकरी लावून देण्याच्या आमिषातून प्राध्यापकाला ११ लाखांना गंडा appeared first on पुढारी.