जळगाव : शिंदे गटाचा गुवाहाटीचा दौरा रखडला? कारण काय….

मंत्री गुलाबराव पाटील www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील मंत्री व आमदार यांची सोमवारी, दि. 21 तारखेला गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र साेमवारी, दि. 21 नोव्हेंबर ऐवजी लवकरच दुसरी तारीख जाहीर होणार असून नवीन तारीख आल्यावर गुवाहाटीला जाण्याबाबत निर्णय होईल, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या अडावद येथे जलजीवन मिशन योजनेतून 36 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून या योजनेचे भूमिपूजन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी गुलाबराव पाटील यांचा आमदार लता सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.

गुवाहाटी दौऱ्यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, येत्या दि. 21 तारखेला गुवाहाटीला जाण्याची त्यांची तारीख ठरली होती. पण त्या दिवशी जिल्हा नियोजनाची बैठक असल्याने जाण्याचे रद्द झाले असून पुन्हा नवीन तारीख येईल, अशी माहिती मिळाली आहे. जळगाव जिल्ह्यात निवडणूक असल्याने माझे जाणे होणार नाही असे वाटत आहे. नवीन तारीख काय मिळते त्याबाबत नंतर सांगण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले आहे.

हम तो वो है जिसे बदनामी डरती है…

आमदार होऊ, मंत्री होऊ हे आम्ही कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. तरी देखील विरोधक आमची बदनामी करत आहेत. “बदनाम तो वो होते है जो बदनामी से डरते है. हम तो वो है जिसे बदनामी डरती है” अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचे आदर्श आहेत. नितीन गडकरी हे देशात ज्या पद्धतीने विकास कामे करत आहेत. त्यामुळे राज्यपाल यांनी त्यांचा उल्लेख शिवाजी महाराजांप्रमाणे केला असेल, असं मला वाटतं. मात्र ही बातमी किती सत्य आहे ते पाहिल्यावरच बोलता येईल, अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा:

The post जळगाव : शिंदे गटाचा गुवाहाटीचा दौरा रखडला? कारण काय.... appeared first on पुढारी.