जळगाव : शेतात बैलजोडी घुसल्याने काका-पुतण्यात वाद होऊन एकाचा मृत्यू

मारहाण.www.pudhari.news

 जळगाव (पाचोरा) : पुढारी वृत्तसेवा

शेतात बैल घुसल्याच्या कारणावरुन काका-पुतण्यात वाद होऊन वादाचे पर्यवसन हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये जखमी पुतण्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून याबाबत पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तर पोलिसांनी मयताच्या चुलत भावास ताब्यात घेतले आहे.

या घटनेबाबत पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांकडुन प्राप्त झालेली माहिती अशी की, वाडी (शेवाळे) ता. पाचोरा येथील प्रल्हाद मोतीराम भोसले व त्याचा पुतण्या पुनमचंद भोसले यांची शेतजमीन शेजारी शेजारी असल्याने पुनमचंद भावराव भोसले यांचा मुलगा किरण पुनमचंद भोसले यांची बैलजोडी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ च्या दरम्यान प्रल्हाद मोतीराम भोसले यांच्या शेतात शिरली. त्याचा राग आल्याने प्रल्हाद भोसले याने नातू किरण भोसले याच्या पाठीत काठीने वार केला. तसेच प्रल्हाद भोसले यांचा मुलगा गणेश भोसले याने पुनमचंद भोसले यांच्या डोक्यात काठीने जोरदार वार केला. यामुळे पुनमचंद हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ जळगाव येथे उपचारासाठी आणले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांचेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. मात्र, मंगळवारी, दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मारहाण करणा-या प्रल्हाद भोसले व गणेश भोसले यांचेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार हे पुढील तपास करित आहेत.

दरम्यान, शेतात बैल शिरल्याच्या किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्याने किरण पुनमचंद भोसले याने चुलत आजोबा प्रल्हाद मोतीराम भोसले व गणेश भोसले यांचे विरुध्द २७ नोव्हेंबर रोजी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर सहाय्यक फौजदार रवींद्र पाटील, किरण ब्राह्मणे, अरुण राजपुत यांनी वाडी येथे जावून गणेश भोसले यास ताब्यात घेत न्यायालयात हजर केले असता गणेश भोसले यास ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

हेही वाचा

The post जळगाव : शेतात बैलजोडी घुसल्याने काका-पुतण्यात वाद होऊन एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.