जळगाव हादरले! बसस्थानक परिसरात तरुणाचा खून

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही महिन्यांपासून जळगावात खुनाचे सत्र सुरुच असल्याचे चित्र आहे. बुधवारी (दि.२०) पुन्हा एकाचा खून करण्यात आला आहे. जळगावात या खुनामुळे एकच खळबळ उडाली आहे. शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात किरकोळ वादातून दोन जणांनी एकाची चाकू भोसकून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २०) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. या खूनानंतर एक संशयित स्वत:हून पोलीस ठाण्यात जमा झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील जुन्या बसस्थानक येथे जुन्या वादाच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणमारी झाली. यावेळी एकावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यात आकाश सुरेश सपकाळे (वय ३०, रा. कोळी पेठ, जैनाबाद जळगाव) या तरुणाचा खून झाला आहे. यामध्ये मयताचा भाऊ सागर सुरेश सपकाळे आणि सागर आनंदा सपकाळे हे दोन जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

संशयित पोलीस ठाण्यात हजर

घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी घटनास्थळी दाखल झाले आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांसह मित्रपरिवाराची प्रचंड गर्दी जमली होती. या घटनेनंतर संशयित गोपाल कैलास सैंदाणे (वय ३०, रा. शनिपेठ) स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचलंत का?

The post जळगाव हादरले! बसस्थानक परिसरात तरुणाचा खून appeared first on पुढारी.