Site icon

जागतिक तंबाखूविरोधी दिनविशेष : सिगारेट तुम्ही घेताय ; आरोग्य इतरांच बिघडतयं

नाशिक : दीपिका वाघ
सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्याला बंदी असली तरी लक्ष कोण देतय? लोक सर्रास चहाची टपरी, हॉटेल्स अशा सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग करतात. पण सिगार, बिडी, पाईप, सिगारेटच्या धुराच्या संपर्कात येणार्‍या इतर लोकांचे आरोग्य बिघडतयं. धुराच्या संपर्कात येणे म्हणजे पॅसिव्ह स्मोकिंग. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दररोज 14 हजार लोक धुम्रपानाच्या सवयीमुळे जीव गमावतात तर धुराच्या संपर्कात येणार्‍या लोकांना व्याधी जडतात. सिगारेटचा धूर कपड्यांवर, वापरात येणार्‍या वस्तू, कान व नाका तोंडावाटे फुफ्फुसात जातो. यामुळे ह्दयविकार, फुफ्फुसाचा कर्करोग, दमा सारख्या अनेक व्याधी जडतात शिवाय धुरामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते. सिगारेट घेणे जेवढे धोकेदायक आहे तेवढेच धोकेदायक सिगरेटच्या धुराच्या संपर्कात येणे असते. पॅसिव्ह स्मोकिंगमुळे माणसाचे सरासरी 15 वर्षांनी आयुष्य कमी होते.

सिनेमा सिरिजमधून धुम्रपानाचे उदात्तीकरण
धुम्रपानाचे दुष्परिणाम माहिती असतांना सिगरेट घेणे स्टाईल झाली आहे. त्याला सिनेमा, सिरिजने अधिकच पाठबळ दिले आहे. सिनेमांमध्ये स्त्रीमुक्तीचा संदेश देतांना, बोल्ड बिनधास्त पात्र किंवा अत्याचार झालेली महिला सिगरेट शिवाय पात्राला वजन प्राप्त होत नाही असा संदेशच जणू सिनेमांमधून दिला जातो. सिगरेटच्या धुरात जोपर्यंत हिरो टाळ्या खाऊ डायलॉग बोलत नाही तोपर्यंत तो हिरो वाटत नाही. तीच स्टाईल कॉपी करत तरूणपिढी कुतूहल म्हणून सिगरेट घेतात.

पॅसिव्ह स्मोकिंग अ‍ॅक्टीव्ह स्मोकिंग इतकेच घातक आहे. स्मोकिंग आणि कॅन्सर असाच विचार केला जातो पण पॅसिव्ह स्मोकिंगमुळे कॅन्सर व्यतिरिक्त इतर आजार होतात. अस्थमा, डोळ्यांचे, त्वचेचे विकाराव्यतिरिक्त गरोदर महिलेला पॅसिव्ह स्मोकिंग होत असेल तर बाळावर दुष्परिणाम होतो. तरूणांमध्ये वंध्यत्वाच्या ज्या समस्या निर्माण होतात त्याचे मुख्य कारण पॅसिव्ह स्मोकिंग आहे. त्यासाठी स्मोकिंग फ—ी वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. -डॉ राज नगरगर, कर्करोग तज्ञ.

का साजरा केला जातो?
जागतिक आरोग्य संघटनेने 7 एप्रिल 1988 जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्याचे ठरविले पण त्याचा ठराव 31 मे 1988 मध्ये पारित झाल्यानंतर दरवर्षी 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जाऊ लागला. त्यामगील उद्देश लोकांना तंबाखूच्या सेवनामुळे होणारे नुकसान पटवून देणे असा होता.

योग्य पावले उचलली नाही तर?
जागतिक आरोग्य संघटनेच्या नुसार, सध्या जगभरात धुम्रपानाच्या सेवनामुळे दरवर्षी 50 लाखांहून अधिक लोक जीव गमावतात. या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी पावले उचलली नाही, तर 2030 पर्यंत धुम्रपानामुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या दरवर्षी 80 लाखांच्या पुढे जाईल.

हेही वाचा:

The post जागतिक तंबाखूविरोधी दिनविशेष : सिगारेट तुम्ही घेताय ; आरोग्य इतरांच बिघडतयं appeared first on पुढारी.

Exit mobile version