जागतिक बेघर दिन : १६ बेघर निवारा केंद्रात दाखल

बेघर www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत जागतिक बेघर दिनानिमित्त १ ते १० ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली. या दहा दिवसांच्या कालावधीत शहरातील विविध भागांतून १६ बेघर महिला व पुरुषांना महापालिकेने निवारा केंद्रात दाखल करून घेतले.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सूचनेनुसार आणि उपआयुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बेघर शोधमोहीम राबविण्यात आली. १० ऑक्टोबर रोजी रात्री ७ ते १२ या वेळेत नाशिकरोड येथे रेल्वेस्थानक, बसस्थानक, शनी मंदिर, दुर्गा मंदिर, मुक्तिधाम आणि उड्डाणपुलाखाली बेघर शोधमोहीम राबविली. या मोहिमेत एकूण १६ वृद्ध, रुग्ण, दिव्यांग बेघर महिला आणि पुरुषांना निवारा केंद्रात दाखल केले. मोहिमेत रात्री १२.३० वाजता सर्व बेघर व्यक्तींना अतिक्रमण विभागाचे वाहन आणि रामकृष्ण आरोग्य संस्थानच्या खासगी वाहनाने निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. सर्व बेघर व्यक्तींना संस्थेतर्फे तत्काळ अंथरूण, पांघरूण, साहित्य तसेच भोजनाचीदेखील व्यवस्था उपलब्ध करून दिली. या मोहिमेसाठी डे-एनयूएलएम अभियानांतर्गत कार्यरत शहर अभियान व्यवस्थापक, समूह संघटक, अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच बेघर निवारा केंद्राचे देखभाल आणि व्यवस्थापन करत असलेले त्र्यंबक येथील रामकृष्ण आरोग्य संस्थान या संस्थेचे संचालक आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

हेही वाचा:

The post जागतिक बेघर दिन : १६ बेघर निवारा केंद्रात दाखल appeared first on पुढारी.