जागतिक युथ टेबल टेनिससाठी नाशिकच्या तनिशाची निवड

तनिशा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ट्यूनीशिया येथे होणाऱ्या जागतिक युथ अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलींच्या भारतीय संघात नासिकच्या तनिशा कोटेचा हिची निवड झाली आहे. भारताचा १९ वर्षाखालील मुलींचाच संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारी तनिशा ही नासिकची दुसरी टेबल टेनिस खेळाडू आहे. सन २०२१ मध्ये पोर्तुगाल येथे झालेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत १५ वर्षाखालील मुलींच्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व नाशिकच्या सायली वाणी हिने केले होते.

जागतिक युथ टेबल टेनिस स्पर्धा ४ ते ११ डिसेंबर या कालावधीत भारतासह जपान, फ्रान्स, सिंगापूर, चायना, ट्यूनीशिया, इजिप्त, अमेरिका, कोरिया, रोमानिया, पोलेन्ड आणि चायनीज ताईपैई आदी एकूण १२ देशांचे संघ प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रातील निवड झालेली ती एकमेव खेळाडू असून, याशिवाय यशस्विनी घोरपडे (कर्नाटक), निथ्या मनी (तामिळनाडू), सुहाना सैनी (हरियाणा) या खेळाडूंचाही भारतीय संघात समावेश आहे. तनिशा ही १७ वर्षाखालील मुलींच्या गटात राष्ट्रीय स्तरावर सध्या प्रथम, तर १९ वर्षाखालील मुलींच्या गटात तनिशा चौथी मानांकित आहे. तसेच तिला १७ वर्षाखालील व १९ वर्षाखालील मुलींच्या गटात आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुक्रमे एकविसावे व सदोतिसावे मानांकन आहे. ती जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

दरम्यान, तनिशा कोटेचा हिच्या निवडीबद्दल नासिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, क्रीडा संचालक सुहास दिवसे, सचिव शेखर भंडारी आदींनी कौतुक केले.

हेही वाचा :

The post जागतिक युथ टेबल टेनिससाठी नाशिकच्या तनिशाची निवड appeared first on पुढारी.