जिल्हाधिकारी जलज शर्मा :बोगस डॉक्टरांविरुद्ध केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करा

डॉक्टर www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेवून त्यांच्याविरुद्ध शासनाने वेळोवेळी निर्देशित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे कार्यवाही करावी.  केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आरोग्य यंत्रणेने तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात गुरुवारी, दि.29 दुपारी बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी गठित जिल्हास्तरीय समितीची त्रैमासिक बैठकीप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कंचन वानेरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. आर. शेख, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त के. एस. देशमुख, समितीचे अशासकीय सदस्य डॉ. योगेश सूर्यवंशी, ॲड. चंद्रकांत येशीराव, सर्व तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, धुळे जिल्ह्यात बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार करणे ही गंभीर बाब आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने बोगस डॉक्टरांच्या तपासणीसाठी शासनाने गठित केलेल्या तालुकास्तरीय समिती मार्फत विशेष मोहीम राबवावी. आवश्यक तेथे पोलिस दल व अन्न व औषध प्रशासन विभागाची मदत घेवून सांघिकपणे काम करावे. बोगस वैद्यकीय व्यावसायिकांची सुधारित यादी तयार करुन पुढील 15 दिवसांत ठोस कार्यवाही करून अहवाल सादर करावा. तसेच काही संवेदनशील भागात बोगस डॉक्टरांच्या शोधासाठी विशेष कृती दल गठित करण्याची सूचनाही त्यांनी केली. नागरिकांनीही परिसरातील बोगस डॉक्टर व्यवसाय करीत असल्यास जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तपशील देण्याचे अहवान त्यांनी केले. बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर कार्यवाही करण्यासाठी पोलीसांची मदत आवश्यक असल्यास ते उपलब्ध करुन देण्यात येईल. असे अपर पोलीस अधिक्षक काळे यांनी बैठकीत सांगितले. बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध मोहिमेबाबत आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती जिल्हा आरोगय अधिकारी डॉ. नवले यांनी दिली.

हेही वाचा:

The post जिल्हाधिकारी जलज शर्मा :बोगस डॉक्टरांविरुद्ध केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करा appeared first on पुढारी.