जिल्हाधिकारी जलज शर्मा : विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया, टेक्नॉलॉजीचा वापर भविष्य घडविण्यासाठी करावा

धुळे www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

सुशिक्षित तरुण पिढी ही या देशाची शक्ती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया व आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करिअर घडवण्यासाठी केला पाहिजे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बुधवार, दि. 14 रोजी धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थी आणि पोलीस सुसंवाद या कार्यक्रमाप्रसंगी केले.

कार्यक्रमास पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी, माजी महापौर जयश्री अहिरराव, स्थायी समितीच्या माजी सभापती बालीबेन मंडोरे, शिवसेना महिला आघाडीच्या हेमा हेमाडे तसेच सरोज कदम, नगरसेविका माया परदेशी यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, शहरचे आनंद कोकरे, पश्चिम देवपूरचे नितीन देशमुख, देवपूरचे मोतीराम निकम, चाळीसगावरोड पोलीस ठाण्याचे संदीप पाटील, आझाद नगरचे प्रमोद पाटील तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू आदी उपस्थिती होते. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमात अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी पोलीस दलाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यात विशेषता ‘दामिनी पथक’ आणि ‘भरोसा सेल’ तसेच ‘पोलीस काका’ आणि ‘पोलीस दीदी’ या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात सायबर क्राईम संदर्भात ॲडव्होकेट चैतन्य भंडारी आणि  ऋषिकेश रेड्डी यांनी चित्रफितीच्या माध्यमातून ऑनलाईन होणारी फसवणूक टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन केले. विद्यार्थी प्रतिनिधी चेतना काळे यांनी स्वतः पासून कायद्याचे रक्षण करण्यासाठी पोलिसांना मदत करावी, असे आवाहन केले. सोशल मीडियाचा वापर करीत असताना फॉलोवर आणि लाइक्स वाढवण्याच्या नादात फसवणूक होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही विद्यार्थिनीने अत्याचार किंवा त्रास झाल्यास दामिनी पथकाबरोबर संपर्क करून मोकळेपणाने भावना व्यक्त व्यक्त केल्यास समाजातील गुन्हेगारीला त्याच ठिकाणी संपवण्यात पोलिसांना मदत मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले. तर विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक वैभव सबनीस यांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून पोलीस दलाने सुरू केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. जनतेला सुरक्षा देणारे पोलीस हे देवदूतच आहे. सध्या सोशल मीडियाचा अमर्याद वापर सुरू आहे. त्यामुळे या वापराचा हँगओव्हर संपत नाही. परिणामी ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये देखील वाढ होत आहे. या फसवणुकी संदर्भात प्रबोधन करणे गरजेचे आहे. त्याच हेतूने हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरतो. मात्र आपण देखील रक्षक असणाऱ्या पोलिसांना मदतीच्या भूमिकेत त्यांच्याशी सुसंवाद ठेवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. माजी नगरसेवक सत्तार शाह यांनी विद्यार्थ्यांना शालेय कालावधीत आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे तसेच देश सक्षम करण्यासाठी कोणत्याही चुकीच्या मार्गाला लागू नये असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा तसेच आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे. याबरोबरच शारीरिक सक्षमतेसाठी देखील व्यायामावर भर दिलास त्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो. शालेय जीवनापासून कोणत्याही अमली पदार्थाला बळी पडू नये ,असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अध्यक्षीय भाषणात केले.

पोलीस दादा आणि पोलीस दीदी हा उपक्रम आता शालेय आणि महाविद्यालयीन स्तरापर्यंत नेण्यात येणार असल्याचे सांगितले या अंतर्गत प्रत्येक शाळेत संबंधित पथकाचे मोबाईल नंबर असलेले बॅनर लावले जातील. त्याचप्रमाणे व्हाट्सअपचे ग्रुप तयार केले जातील. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची माहिती सरळ या पोलीस काका आणि पोलीस दीदी यांना दिल्यास गुन्हेगारी रोखण्यास मदत होऊ शकते. नेमणूक केलेले हे संबंधित पोलीस कर्मचारी देखील थेट विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहणार असल्याने विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या त्यांना कळतील. आणि त्यावर मार्ग काढणे सोपे जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यक्त झाले पाहिजे. – संजय बारकुंड, पोलीस अधीक्षक.

विद्यार्थ्यांचा मुक्तसंवाद….
पार्थ पवार, ज्ञानेश्वरी बिडवे, विशाल पावरा, शाह अलीना जुबेर, सानिया शेख ,अतुल निकम ,माही रेलन ,हर्षदा चव्हाण, प्रेमराज पाटील यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी भावनांना मोकळी वाट करुन दिली. तसेच पोलीस दलाविषयी पूर्वी वाटणारी भीती आता वाटत नाही.  पोलीस आमचे रक्षक आहे. हे कळाल्याने त्यांच्या संपर्कात राहू. कोणत्याही प्रकारचा अन्याय झाल्यास कायदा हातात न घेता पोलिसांच्या  वेगवेगळ्या पथकांना माहिती देणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post जिल्हाधिकारी जलज शर्मा : विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया, टेक्नॉलॉजीचा वापर भविष्य घडविण्यासाठी करावा appeared first on पुढारी.