जि. प. कर्मचारी पतसंस्था निवडणूक : आपला-सहकार पॅनल समोरासमोर

बाजार समिती निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जि.प. कर्मचारी पतसंस्थेच्या कार्यकारिणीसाठी  6 नाव्हेंबरला निवडणूक होत आहे. तब्बल 1,480 सदस्य असलेल्या या पतसंस्थेच्या गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्या. या दोन्हींप्रमाणे हीदेखील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न झाले होते. मात्र, त्याला यश आले नसल्याने निवडणूक अटळच आहे. आपला पॅनल आणि सहकार पॅनल या दोन्ही पॅनलच्या वतीने रविवारी (दि. 30) पत्रकार परिषदा घेण्यात आल्या.

आपला पॅनलच्या वतीने वचननामा सादर करण्यात आला. त्यामध्ये कर्जावरील व्याजदर 10.50 टक्क्यांवरून टप्प्याटप्प्याने 9 टक्के करणे, कर्जमर्यादा 7 लाखांवरून टप्प्याटप्प्याने 15 लाख करणे, नवीन जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीजवळ संस्थेची नवीन अद्ययावत वास्तू उभारणे, कुटुंब कल्याण संरक्षण योजनेची व्याप्ती 1 लाखावरून 3 लाख करणे, सभासदांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना सुरू करणे, तातडीच्या वैद्यकीय सुविधेसाठी आकस्मिक कर्ज योजना सुरू करणे, सेवानिवृत्त सभासदांना आपली पुंजी ठेवण्यासाठी व वर्ग सभासद करून सुविधा देणे, पतसंस्थेतून कर्ज घेताना कपात करण्यात येणारी अधिकची 5 टक्के शेअर्स रक्कम कमी करणे, ही आश्वासने आहेत. तसेच सेवानिवृत्त सभासदांना ठराविक रकमेपर्यंत कर्ज सुविधा पुरविण्याचा मानस यांचा समावेश आहे. यावेळी पॅनल नेते पंडितराव कटारे, अजित आव्हाड, प्रशांत कवडे, राजेश आहेर, राजेश जाधव, दिलीप वारे, निवृत्ती बगड, उदय लोखंडे, राजेश बैरागी, योगेश गोळेसर आदी उपस्थित होते.

पतसंस्था ही कर्मचार्‍यांची मातृसंस्था असून, तिच्या स्थैर्यासाठी पॅनल काम करेल. तरुण चेहर्‍यांना संधी दिली आहे. पतसंस्थेच्या दोन पंचवार्षिक निवडणुका कर्मचार्‍यांना विश्वासात घेऊन बिनविरोध केल्या असताना, यंदाही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांमध्ये एकमत न झाल्याने निवडणुकीस सामोरे जावे लागत आहे. केवळ दोन ते तीन लोकांच्या हट्टासाठी ही निवडणूक होत आहे. – विजयकुमार हळदे, आपला पॅनलप्रमुख.

सहकार पॅनलतर्फेदेखील जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने कर्मचारी पतसंस्था असल्याने नफा कमविणे हा प्रमुख उद्देश न ठेवता, व्याजदर 9 टक्क्यांपर्यंत कमी करणे, सभासदांच्या मागणीप्रमाणे कर्जमर्यादा 15 लाख करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सभासदांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देऊन लाभांश व इतर आर्थिक लाभ सभासदांच्या बँक खात्यात जमा करण्याची सुविधा सुरू करीत सभासदांचा वेळ व पैशाची बचत करणे, यावर भर देण्यात आला आहे. तसेच सोने तारण कर्ज सुविधा सुरू करणे, तातडीचे कर्ज अर्ज ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून 25 हजार रुपये मंजूर करणे, सेवानिवृत्त सभासदांना 25 हजार रुपये कर्जसुविधा सुरू करणे, पतसंस्थेची स्वत: सोलर सिस्टीम तयार करून वीज देयकाची बचत करणे, पतसंस्थेचे कामकाज एकाधिकारशाही व मनमानी कारभारापासून अलिप्त ठेवणे यांचा समावेश आहे. यावेळी पॅनलचे नेते रवींद्र आंधळे, महेश पैठणकर, बाळासाहेब ठाकरे, रवींद्र शेटे, विलास शिंदे, जितेंद्र पाटील, सचिन विंचूरकर, मंदाकिनी पवार आदी उपस्थित होते.

पतसंस्थेच्या पारदर्शक कारभारासाठी बिनविरोध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला. मात्र, सत्ताधार्‍यांमधील अनेकांनी वेळेत माघार न घेतल्याने निवडणूक लादली गेली. पतसंस्थेचा कारभार पारदर्शक, विकासाभिमुख होण्याच्या द़ृष्टीने पॅनल केला आहे. पतसंस्थेचे कामकाज एकाधिकारशाही व मनमानी कारभारापासून अलिप्त ठेवण्यासाठी काम करणार आहे. – प्रमोद निरगुडे, सहकार पॅनलप्रमुख.

हेही वाचा:

The post जि. प. कर्मचारी पतसंस्था निवडणूक : आपला-सहकार पॅनल समोरासमोर appeared first on पुढारी.