Site icon

ज्योतिरादित्य सिंधिया : महाराष्ट्रातील विमानसेवेला गती देणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्रातील विमानसेवेला गती देण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयातर्फे विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही केंद्रीय विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजच्या पदाधिकार्‍यांसमवेत दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी याबाबत आश्वासन दिले. यावेळी चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्रातील विविध विमानतळांच्या अपेक्षांचा अहवाल सादर केला.

अहवालात जळगाव, नांदेड, गोंदिया, लातूर या विमानसेवांसाठी पूर्ण असलेल्या विमानतळांवरील विमानसेवा त्वरित सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणाची कामे गतीने पूर्ण करावीत, कार्गो टर्मिनस सेवा सुरू करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. ना. सिंधिया यांनी कामे गतीने पूर्ण करण्याची तसेच कार्गो सेवा सुरू करण्याची ग्वाही यावेळी दिली. तसेच लवकरच विमान कंपन्यांसोबत बैठक घेऊन विमानसेवा सुरू करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी याप्रसंगी दिले. त्याचबरोबर नागपूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद विमानतळ येथून विविध नवीन मार्गांवरून सेवा सुरू करण्याची मागणी केली असता, लवकरच विमान कंपन्यांसोबत बैठक घेऊन याबाबत सकारात्मक विचार करणार असल्याचेही ना. सिंधिया यांनी स्पष्ट केले. बैठकीस शशांक त्रिवेदी, योगिन गुर्जर, केतन शहा आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post ज्योतिरादित्य सिंधिया : महाराष्ट्रातील विमानसेवेला गती देणार appeared first on पुढारी.

Exit mobile version