ट्विन टॉवर्स पाडले; नाशिकमध्ये धाबे दणाणले

ट्विन टॉवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देशातील सर्वांत मोठे 32 मजली ट्विन टॉवर्स अवघ्या 12 सेकंदांत जमीनदोस्त झाले अन् भ्रष्टाचाराचे टॉवर पडले म्हणून देशभरातील लोकांनी टाळ्यांचा गजर केला. या कारवाईमुळे देशभरात सकारात्मक संदेश गेला असला तरी, बेकायदेशीरपणे भ्रष्टाचाराचे इमले उभारणार्‍यांचे मात्र धाबे दणाणले आहेत. नाशिकमधील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून, माहिती अधिकार कार्यकर्ते सरसावल्याने काही बांधकाम व्यावसायिकांचा ताप वाढण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भ्रष्टाचार प्रकरणी नोएडातील ट्विन टॉवर्स अवघ्या काही सेकंदांत जमीनदोस्त केल्याचा नजारा देशभरातील लोकांनी दूरचित्रवाणीच्या माध्यमातून बघितला. ही कारवाई म्हणजे  भ्रष्टाचाराला चाप असल्याचा संदेशही यानिमित्त सर्वत्र पोहोचला. त्यामुळे बेकायदेशीरपणे इमले रचणार्‍यांचा ताप वाढला असून, आपल्यावर तर अशा प्रकारची कारवाई होणार नाही? या विचारानेच ही मंडळी अस्वस्थ आहे. नाशिक शहर व परिसरात बेकायदेशीर बांधकामाचा मुद्दा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. काही बिल्डर्सकडून अधिकार्‍यांना हाताशी धरून अनेक इमारती बेकायदेशीर बांधल्याचे यापूर्वीही समोर आले आहे. सद्यस्थितीत शहराच्या चहूबाजूने बेकायदेशीर बांधकामे दिसून येतात. काही बांधकामे वादग्रस्त ठरली असून, काहींची प्रकरणे थेट न्यायालयापर्यंत पोहोचली आहेत.

दरम्यान, ट्विन टॉवर्सवरील कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर बांधकामावरून माहिती अधिकार कार्यकर्ते सरसावले असून, अशा प्रकारच्या बांधकामांची कागदपत्रे जुळवाजुळव करण्याचे कामे सुरू झाले आहे. केवळ बिल्डर्स नव्हे तर त्यांना साथ देणार्‍या अधिकार्‍यांचाही डेटा यानिमित्त गोळा केला जात आहे. यातील काही इमारती शहराच्या मध्यवर्ती भागात असून, यामध्ये मोठा भ—ष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अधिकार्‍यांनी अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्याचा कागदोपत्री खटाटोप केला असला तरी, त्यास अनेक कंगोरे असल्याने अशी बांधकामे वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची शक्यता आहे. बेकायदेशीरपणाचा ठपका असलेली काही बांधकामे पूर्ण झालेली असून, काही अर्धवट स्थितीत आहेत. या बांधकामांमधील भ—ष्टाचार लवकरच उघडकीस आणला जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

न्यायालयात लढा देऊ….

शहराच्या मध्यवर्ती भागात एक मोठी बिल्डिंग उभारली जात असून, हे बांधकाम पूर्णत: अनधिकृत आहे. मात्र, अधिकार्‍यांना हाताशी धरून हा सर्व भ—ष्टाचार केला जात आहे. या बांधकामाबाबतची बरीच माहिती कागदोपत्री आम्ही गोळा केली असून, लवकरच याबाबतची याचिका न्यायालयात दाखल केली जाणार आहे. ट्विन टॉवर प्रकरणी न्यायालयाने दिलेला निकाल खरोखरच हुरूप आणणारा असल्याचे एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.

अधिकारीही अडकणार…

शहरातील काही बड्या बांधकाम व्यावसायिकांनी अधिकार्‍यांना हाताशी धरून भ—ष्टाचाराचे इमले उभारले आहेत. बांधकामे बेकायदेशीर असतानादेखील अधिकार्‍यांच्या मदतीने ते कायदेशीर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या बांधकामांना ज्यांनी-ज्यांनी विरोध केला, त्यांनाही साम, दाम, दंड, भेद ही नीती वापरून शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, ट्विन टॉवर्सच्या कारवाईनंतर आता हिच मंडळी पुन्हा एकदा तक्रारीसाठी पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना मदत करणारे अधिकारीही आता गोत्यात येण्याची शक्यता आहे.

राजकीय पाठबळाचा दुरपयोग 

अनधिकृत बांधकामे उभारणार्‍या काही बिल्डर्सनी राजकीय पाठबळाचा दुरुपयोग केल्याचे दिसून येते. शहरातील मोक्याच्या ठिकाणी जी अनधिकृत बांधकामे आहेत, त्यात राजकीय हस्तक्षेप दिसून येतो. त्यामुळे सर्व काही आपण अधिकृतच केले, अशा अविर्भावात काही मंडळी वावरत आहेत. मात्र, लवकरच याबाबतचा मोठा भंडाफोड होण्याची शक्यता निर्माण झाल्याने, यामध्ये काही राजकीय नावेदेखील पुढे येणार आहेत.

ग्राहकांनो सावधान

अनधिकृत इमारती उभारून 35 लाखांपेक्षा अधिक किमतींचे फ्लॅट, दुकाने विकण्याचा प्रकार सध्या जोरदार सुरू आहे. मात्र, या वादग्रस्त इमारतींची वस्तुस्थिती समोर आल्यास, या इमारतींमध्ये गुंतवणूक करणार्‍या ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. अशात वेळीच सावध होऊन ग्राहकांनी व्यवहार करताना सर्व कागदपत्रांची पडताळणी करणे गरजेचे आहे.

हेही वाचा :

The post ट्विन टॉवर्स पाडले; नाशिकमध्ये धाबे दणाणले appeared first on पुढारी.