…तर लष्करी जवानांनी कसाबचा जागेवरच खात्मा केला असता : दीपचंद

नाशिकरोड; पुढारी वृत्तसेवा : जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांना दररोज कंठस्नान घातले जात आहे. मुंबई हल्ल्यातील कसाब पोलिसांच्या ऐवजी जवानांच्या हाती लागला असता, तर त्याचा जागेवरच खात्मा केला असता. त्यासाठी करोडो रुपये खर्च करण्याची वेळच येऊ दिली नसती, असे प्रतिपादन कारगील योद्धा दीपचंद यांनी केले.

देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात शनिवारी (दि.१३) स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजय मेधणे होते.

दीपचंद पुढे म्हणाले की, कुठल्याही राजकीय नेत्यांची मुले शक्यतो सैन्यात राहत नाही. भारतात आज अशी अनेक मुले आहेत. त्यांनी देशासाठी शहीद झालेल्या आपल्या वडिलांचा चेहराही बघितलेला नाही. त्याचप्रमाणे शहीद जवानांनाही आपल्या मुलाला पाहता आलेले नाही. प्राचार्य डॉ. विजय मेधणे यांनी सेवानिवृत्त लष्करी जवान दीपचंद यांनी कारगिल युद्धात महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी आपले दोन्ही पाय, एक हात गमावला. त्यामुळे त्यांना कारगील योद्धा म्हणून गौरविण्यात आल्याचे सांगितले.

यावेळी विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख उपप्राचार्य प्रा. दिलीप जाधव, प्रा. डॉ. कैलास लभडे, डॉ. अविनाश काळे, प्रा. सतीश कावळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. मिलिंद ठाकरे, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख लेफ्टनंट पुरुषोत्तम गांगुर्डे, प्रा. संतोष कर्डक आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सविता आहेर यांनी केले.

हेही वाचलंत का ? 

The post ...तर लष्करी जवानांनी कसाबचा जागेवरच खात्मा केला असता : दीपचंद appeared first on पुढारी.