Site icon

तात्पर्य : सुवर्णत्रिकोणातील दुसरी व तिसरी बाजू

नाशिक : प्रताप म. जाधव

अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेतील रस्ते चांगले नाहीत, तर अमेरिकेतील रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे’, असे वाक्य त्या देशाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी उच्चारून काही दशके उलटली. पण, सर्वांगीण समृद्धी आणि उत्तम दळणवळण सुविधांचा थेट संबंध आजही तसाच कायम आहे; किंबहुना लोक उपजीविका, अध्ययन, पर्यटनादी हेतूंसाठी वाढत्या संख्येने प्रवास करायला लागल्यानंतर तो अधिकच घट्ट झाला आहे. ही वैश्विक चर्चा करण्याचे निमित्त मात्र स्थानिकच आहे.

राज्यातील सुप्रसिद्ध सुवर्णत्रिकोणातील एक कोन अशी आपल्या नाशिकची होणारी वाहवा आपण गेली काही दशके ऐकत आहोत. मुंबई-पुणे-नाशिक हा तो सुवर्णत्रिकोण आहे हे सर्वविदीत आहेच. पण, या त्रिकोणातील मुंबई-नाशिक आणि पुणे-नाशिक या दोन बाजू म्हणाव्या तितक्या मजबूत कधीच झाल्या नाहीत. मग तो रस्त्यावरील प्रवास असो, रेल्वे मार्गावरचा असो वा अगदी हवेतला. तेच मुंबई-पुणे-मुंबई या मार्गावरील सुविधांचा विचार केला तर त्या दोन शहरांदरम्यानचा प्रवास केनेडींच्या व्याख्येनुसार श्रीमंत या कॅटेगरीत मोडणारा म्हणावा लागेल आणि आपण नाशिककर मुंबई-पुण्याला जाताना जे काही करतो, त्याला प्रवास म्हणायचे तर तो कोणत्या कॅटेगरीत बसवायचा हा प्रश्नच आहे. कोणताही विषय अथवा प्रश्न सर्वांगाने समजून घ्यायचा असेल तर त्याची ‘दुसरी बाजू’ समजून घ्यावी लागते, असे म्हणतात. पण, इथे त्रिकोणाच्या ‘दुसरी’ आणि ‘तिसरी’ या दोन्ही बाजू समजून घेतल्याशिवाय हा प्रश्न पुरता समजणार नाही आणि सुवर्णत्रिकोणात कमकुवत झालेल्या या तिसर्‍या कोनाला न्यायही मिळू शकणार नाही. नाशिकची तुलना पुणे-मुंबईसारख्या सर्वार्थाने प्रगत आणि विशाल मेगासिटींशी कशाला करायची, असा प्रश्न इथे उद्भवू शकतो, पण मग नाशिकला त्या त्रिकोणात बळजबरी बसवायचा अट्टहास तरी कशाला करायचा? केवळ नाशिककरांना बरे वाटावे म्हणून? सुरुवातीला आपली गणना देशातच नव्हे, तर उद्योग-व्यवसाय-उच्च शिक्षणाच्या बाबतीत जगात नावाजलेल्या या दोन महानगरांशी व्हायला लागल्यावर नाशिककर जाम खूश होत; पण आता आपण सर्वच बाबतीत त्यांच्या जवळपासही पोहोचू शकत नसल्याचे ध्यानात आल्यावर उलटा न्यूनगंड तयार व्हायला लागला आहे.  ‘देशातील या प्रकारचा पहिलाच’ अशी प्रसिद्धी झालेल्या नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमुळे ही सांस्कृतिक शहरे दोन-अडीच तासांच्या अंतरावर येणार असल्याने नाशिककर सात-आठ तासांच्या कंटाळवाण्या, रटाळ रस्ता प्रवासाच्या आठवणी विसरण्याची स्वप्ने पाहू लागले होते. पण, आता या प्रकल्पाचा प्रस्ताव पुन्हा नव्याने सादर केला जाणार असल्याने जो काही मार्ग तयार होईल, तो पूर्ण होण्यासाठी किती काळ लोटेल, याची शाश्वती राहिलेली नाही. तसेच त्याचे स्वरूप नेमके कसे राहणार हेही नेमकेपणाने कुणी सांगत नसल्याने साराच गोंधळ आहे. हा प्रकल्प अजिबात रद्द झालेला नाही, असे केंद्रात नाशिकचे प्रतिनिधित्व करणार्‍या ना. डॉ. भारती पवार यांनी परवा निक्षून सांगितले. एक कर्तव्य म्हणून त्यांचे हे विधान आले. पण, सुधारित प्रकल्पाबाबत केंद्रातील अधिकृत सूत्रांकडून स्पष्टता होत नाही, तोपर्यंत नाशिककरांच्या मनातील धाकधूक संपणार नाही.  नाशिक-मुंबई महामार्गाच्या राजकीय गोष्टी ऐकून ऐकून पाठ झाल्या आहेत. बडे राजकीय नेते कसारा घाटातील कोंडीत अडकल्याने या महामार्गाकडे शासनाचे लक्ष गेले आणि महामार्ग म्हणण्यासारखे स्वरूप त्याला आले. पण, तरीही त्याच्या देखभाल-दुुरुस्तीबाबत बोंबच आहे. पावसाळ्यात त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत आजी आणि माजी पालकमंत्र्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. आमदार छगन भुजबळ यांनी महामार्ग दुरुस्तीसाठी आधी 1 नोव्हेंबर व नंतर 6 नोव्हेंबरपर्यंत मुदत देत टोल बंद करण्याचा इशारा दिला आहे. सध्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनीही खड्डे बुजवण्यासाठी निर्वाणीची भाषा केली आहे. कोडग्या यंत्रणेकडून त्याला कसा प्रतिसाद मिळतो, यावर नाशिककरांचा मुंबईकडचा प्रवास सुखकर होईल, की नाही हे अवलंबून आहे. मुंबईसह पुण्याचाही प्रवास कमीत कमी वेळात करणे नजीकच्या भविष्यात शक्य झाले तरच ‘आम्ही सुवर्णत्रिकोणातले’ म्हणून मिरवण्यात अर्थ आहे. अन्यथा, ते निरर्थकच म्हणावे लागेल.

हेही वाचा:

The post तात्पर्य : सुवर्णत्रिकोणातील दुसरी व तिसरी बाजू appeared first on पुढारी.

Exit mobile version