तुमचे चिमुकलेही फ्रिजमध्ये डोकावताय काय?

चिमुकले www.pudhari.news

नाशिक : प्रासंगिक : सतीश डोंगरे

चार वर्षाची निरागस ग्रीष्मा आईस्क्रीम मिळेल या आतुरतेने मेडिकल दुकानाबाहेरील फ्रिजमध्ये डोकावतेय अन् वीजेच्या धक्क्याने क्षणार्धात जमिनीवर कोसळते. जेव्हा या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर येतो तेव्हा मात्र, आपलाही चिमुकला किंवा चिमुकली असाच फ्रिजमध्ये डोकावत नाही ना? या विचारानेच काळजात धस्स झाल्याशिवाय राहत नाही. खरं तर चिमुकल्या ग्रीष्माचा बळी गेल्यानंतर पालकांसह यंत्रणेला जाग येणे हेच खरं दुदैव आहे. आज शहरातील मिठाई दुकाने, आईस्क्रीम पार्लर, मेडिकल शॉप्ससह किराणा दुकानांबाहेर सर्रासपणे अशाप्रकारचे फ्रिज नजरेस पडतात. या फ्रिजच्या मेंटेनन्ससह इतर सुरक्षेबाबत ना दुकान मालकांनी कधी भान ठेवले, ना यावरून त्यांना कोणी विचारले? कदाचित याचमुळे चिमुकल्या ग्रीष्माला आपले प्राण गमवावे लागले.

फ्रिजसह इतर वीजवाहक उपकरणे उघड्यावर ठेवताना त्यांच्या सुरक्षेबाबत विचार करणे गरजेचे असते. किमान या उपकरणांपर्यंत सहजासहजी लहानग्ये पोहोचणार नाहीत, याचे तरी विक्रेत्यांनी भान ठेवणे गरजेचे आहे. आज ग्रीष्माच्या मृत्यूनंतर अनेकांना याबाबतचे शहाणपण सुचलेही. मात्र, एका चिमुकलीचा बळी गेल्यानंतर शहानपण सुचणे कितपत संयुक्तिक आहे, हाच खरा प्रश्न यानिमित्त उपस्थित होतो. खरं तर या घटनेनंतर दोष कोणाचा असा प्रश्न अनेकांच्या मनात येत आहे. कारण एकटा विक्रेता या घटनेला जबाबदार धरता येणार नाही. तर अशाप्रकारे उघड्यावर विनासुरक्षा हायहोल्टेज वीजेचा प्रवाह असणाऱ्या फ्रीजसारख्या उपकरणांवर लक्ष न ठेवणारी यंत्रणा व बेजाबदार पालक हे देखील त्यास तितकेच जबाबदार आहेत. कारण आज प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न येत आहे की, ज्या निरागसतेने ग्रीष्मा आईस्क्रीमच्या दिशेने धावत गेली, त्याच निरागसतेने आपल्या पाल्यही आईस्क्रीमसाठी फ्रिजकडे धावत असतो, नि डोकावतोयही. जर ही घटना आपल्याबाबत घडली असती तर…

लहान मुले निरागस असतात. त्यांना चांगल्या-वाईट गोष्टींची जाण नसते. ही बाब सर्वांनाच ठाऊक आहे. पण अशातही बहुतांश लोक बेजाबदारपणे वागून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरतात. काही दिवसांपूर्वी एक कुटुंब आपल्या जुळ्या मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळ्याला गेले. त्याठिकाणी एका रेसॉर्टमध्ये मुक्कामही केला. मात्र, आपण रेस्टॉर्टमध्ये आहोत, आपल्या घरी नाही, अशात मुलांची अधिक काळजी घ्यायला हवी याचे पालक जणू काही भानच विसरून गेले. एक चिमुकला स्विमिंग टँकमध्ये पाण्यावर तरंगत असलेल्या खेळण्यांकडे आकर्षित झाला अन् खेळणी घेण्यासाठी थेट टँकमध्ये पडला. आश्चर्याची बाब म्हणजे तो पाण्यात पडला, तडफडतोय याची कोणालाही भनक लागली नाही. जेव्हा वेळ निघून गेली तेव्हा मात्र पालकांनी धावाधाव केली. जेव्हा या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले तेव्हा मात्र अनेकांनी हळहळ व्यक्त केली. काहींनी पालकांच्या बेजाबदारपणाबद्दल संतापही व्यक्त केला, जो नक्कीच रास्त होता.

खरं तर जेव्हा आपण आपल्या पाल्याला घेऊन घराबाहेर पडतो तेव्हा तो नजरेआड होता कामा नये याचे प्रत्येक पालकाने भान ठेवायला हवे. नेमकी हीच चुक अशाप्रकारच्या दुदैवी घटनांना कारणीभूत ठरत आहेत. ग्रीष्माही अशाच काही चुकांना बळी पडली. अशाप्रकारची दुदैवी घटना आणखी कोणाबरोबर घडू नये म्हणून विक्रेत्यांनीही जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे आहे. उघड्यावर भलामोठा फ्रीज ठेवताना त्याच्यापर्यंत सहजासहजी कोणी पोहोचणार नाही याबाबतच्या पुरेशा उपाययोजना करायला हव्यात. बऱ्याच ठिकाणी ग्राहकच थेट फ्रिजमधील आईस्क्रीम काढतात. अशावेळी विक्रेत्यांनी फ्रिज व्यवस्थितरित्या हाताळू शकेल, असा प्रशिक्षित कामगार त्याठिकाणी नेमायला हवा. तसेच संबंधित यंत्रणांनी या उपाययोजनांकडे बारीक लक्ष ठेवायला हवे. जर कोणी विक्रेता अत्यंत बेजाबदारपणे विनासुरक्षा फ्रीज उघड्यावर ठेवत असेल, त्याचे वेळोवेळी मेटेनेन्स करीत नसेल अशांना दंड ठोकून गुन्हे दाखल करायला हवे. दुदैवी ग्रीष्माच्या मृत्यूतून आपण सर्वांनी याबाबतचा धडा घ्यावा, हीच अपेक्षा.

हेही वाचा:

The post तुमचे चिमुकलेही फ्रिजमध्ये डोकावताय काय? appeared first on पुढारी.