त्र्यंबकला पिंडीवर बर्फामुळे चर्चेला उधाण ; चमत्कार नसल्याचा अंनिसचा दावा

त्र्यंबक,www,pudhari.news

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
प्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवर पहाटेच्या सुमारास बर्फाचा जाड थर जमा झाल्याचे आढळल्याने भक्तांमध्ये दिवसभर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. त्र्यंबकला दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा वाढल्याने मंदिराच्या गर्भगृहातील तापमानातही घसरण झाल्यामुळे पिंडीवर बर्फाचा थर जमा झाल्याचे शास्त्रीय स्पष्टीकरण तज्ज्ञांनी दिले आहे. यामागे कोणताही चमत्कार नसून, कोणत्याही अफवा पसरवू नये, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे.

पुजारी सुशांत तुंगार हे दररोज पहाटे चारला मंदिराचे गर्भगृह उघडतात. त्यांना शिवपिंडीवर बर्फ जमा झालेला दिसला. येथील शिवपिंडीची रचना अन्य ठिकाणांपेक्षा वेगळी आहे. हे योनिस्वरूप ज्योतिर्लिंग आहे. येथे ब—ह्मा, विष्णू, महेश असे तीन उंचवटे आहेत. त्यावर नेहमी पाणी असते. शिवपिंडीतून जल वाहात असते. पिंडीवर बर्फाचा थर जमा झालेला पाहून त्यांनी याबाबत पूजक सत्यप्रिय शुक्ल यांना माहिती दिली. काही दिवसांपासून विरळ बर्फ जमा होत असल्याचे जाणवत होते. मात्र, अशा प्रकारे जाड थर प्रथमच पाहावयास मिळाला. यापूर्वी नैसर्गिक आपत्ती, संकटे आदी घटना घडण्यापूर्वी शिवपिंडीतून ज्वाला बाहेर येणे, आवाज येणे, बुडबुडे दिसणे असे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे आता हे काय संकेत असावेत, अशी चर्चा भाविकांमध्ये सुरू झाली आहे. यामागचे वैज्ञानिक कारण काय असावे, याबाबतही तर्क लढविले जात आहेत. सर्व ज्योतिर्लिंग हे निद्रिस्त ज्वालामुखी असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे. भूगर्भातील हालचालींचे प्रतिबिंब यामागे असावे. पूर्वी बुडबुडे, आवाज आल्यानंतर भूकंप, त्सूनामी अशा घटना घडल्याचा दावा भक्त करतात. भूगर्भातील हालचालींनी नायट्रोजनसारखा शीतवायू बाहेर पडला असेल आणि त्यामुळे बर्फ जमा झाला असेल, असेही कारण काही भक्तांनी व्यक्त केले. अशा प्रकारच्या चर्चा दिवसभर शहरात सुरू होत्या.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून सीसीटीव्ही फुटेजची मागणी :

शिवलिंगावर जमा झालेल्या बर्फाच्या घटनेची सत्यता उघड होण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गर्भगृहातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. भक्तांच्या श्रद्धेला आमचा विरोध नाही. मात्र, चमत्काराच्या नावाखाली गैरसमज पसरवणे चुकीचे आहे. त्यासाठी सत्यतेची पडताळणी झाली पाहिजे, अशी मागणी केली. शुक्रवारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठकसेन गोराणे, कृष्णा चांदगुडे, संजय हरळे आणि दिलीप काळे यांनी देवस्थान ट्रस्ट प्रशासनाचे अधिकारी रश्वी जाधव आणि विश्वस्त भूषण अडसरे यांची भेट घेऊन पत्र दिले. तसेच येथील पोलिस ठाण्यात अर्जही दिला आहे.

आमच्याकडे छायाचित्र नाही :

देवस्थान ट्रस्ट प्रशासनाने आम्ही कोणताही व्हिडिओ अथवा छायाचित्र काढलेले नाही व प्रसारित केलेले नाही. कोणी व्हिडिओ काढला असेल, तर याबाबत चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले.

The post त्र्यंबकला पिंडीवर बर्फामुळे चर्चेला उधाण ; चमत्कार नसल्याचा अंनिसचा दावा appeared first on पुढारी.