Site icon

त्र्यंबकेश्वर मंदिर आजपासून पुन्हा खुले, ज्योतिर्लिंग संवर्धन प्रक्रिया पूर्ण

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर मंदिरातील ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी व मंदिराच्या देखभालीसाठी दि. ५ जानेवारीपासून बंद असलेले मंदिर भाविकांना दर्शनासाठी शुक्रवारी (दि. १३) सकाळी ७ पासून पुन्हा खुले करण्यात आले आहे.

संवर्धनाच्या कालावधीत त्रिकालपूजा, प्रदोष पुष्पपूजा आदी नित्य परिपाठ सुरू होते. मात्र, भाविकांना दर्शनासाठी प्रवेशबंद होता. या कालावधीत भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत शिवलिंगावर वज्रलेप करण्यात आला. औरंगाबाद येथील प्रसिद्ध उद्योजक शेखर देसर्डा यांनी त्र्यंबकेश्वर चरणी अर्पण केलेले चांदीचे दरवाजे गर्भगृहास बसविण्यात आले आहेत. मंदिराच्या सभामंडपात असलेला हर्षमहाल यापुढे दर्शनासाठी दररोज उघडा ठेवण्यात येणार आहे. दररोज रात्री आरती झाल्यानंतर भगवान त्र्यंबकराज शयनासाठी हर्षमहालात येतात, अशी परंपरा आहे. हा महाल म्हणजे सिसम आणि सागवानी लाकडावर केलेल्या अप्रतिम कलाकुसरीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. त्याचेही पुन:सौंदर्यकरण आणि नूतनीकरण केलेले आहे. यापूर्वी भाविकांना हर्षमहाल वर्षातून फक्त तीन वेळा पाहता येत होता. आता तो भाविकांना दररोज दर्शनासाठी खुला राहणार आहे.

सभामंडपातील दर्शनरांगेसाठी बसविण्यात आलेल्या लोखंडी रेलिंग्ज काढून स्टेनलेस स्टीलच्या रेलिंग्ज बसविण्यात आल्या आहेत. सर्व विकासकामे ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश विकास कुलकर्णी व विश्वस्त मंडळाच्या नेतृत्वाखाली व पुरातत्त्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या आहेत. शुक्रवारपासून मंदिर दर्शन सुरू होणार असल्याने गुरुवारी सायंकाळपासूनच भाविकांचा ओघ पूर्वीप्रमाणे सुरू झाला.

हेही वाचा : 

The post त्र्यंबकेश्वर मंदिर आजपासून पुन्हा खुले, ज्योतिर्लिंग संवर्धन प्रक्रिया पूर्ण appeared first on पुढारी.

Exit mobile version