थोडं दुर्लक्ष करूया

गुंता www.pudhari.news

नाशिक : चंद्रमणी पटाईत

अरे यार जिकडे जातो तिकडे मला सारखं हे करू नको… ते केल्याने अमूक होतं, त्यानं शारीरिक व्याधी निर्माण होतील, पैसा वाया जातोय… असंच सांगितलं जातंय… पण यार मी इतर गोष्टी सर्वकाही प्रामाणिकपणे करतो, माझ्या कामातही मी निष्ठेने योगदान देतो, कुटुंबीयांचीही काळजी घेतो, घर-परिवार आणि प्राप्रंचिक जीवनातही कुठे कमी पडत नाही. माझ्याकडे दहा चांगले गुण असतानाही फक्त माझ्या एका अवगुणावरच सर्वत्र बोललं जातं, त्याची चर्चा होते, त्यावरच कीस काढला जातो आणि मी जे काही चांगलं वागतो, करतो, त्या सर्व सकारात्मक गोष्टींवर पाणी फेरलं जातं यार… त्यामुळे अवगुणावरच बोलणार्‍यांच्या मानसिकतेचं काय करावं यार..?

एखादा पांढरा शुभ्र कपडा मस्तपैकी कडक इस्त्री केलेला असतानाही, त्यावर पडलेला एखाद्या छोट्याशा डागाकडे जसं इतरांचं जास्त लक्ष असतं, तसंच काहीसं… असा दोन मित्रांमधला हा संवाद मी ऐकत होतो. वरवर त्यांचे कानावर पडणारे शब्द मीदेखील त्यांच्या बाजूला उभा असल्याने ऐकत होतो. मग, ती चर्चा ऐकताना मलाही त्या अवगुण असलेल्या युवकाच्या मनाची झालेली घालमेल जाणावीशी वाटली. पण, त्यांच्यातील संवादाने एका मित्राने दुसर्‍या मित्राच्या मनातील घुसमट कमी करण्यासाठी केलेला प्रयत्नही भावला. त्याने सहजच त्याला सांगितलं की, अबे, दुनियादारी सोड… जगून घे… आहे तसाच राहा… कोण काय बोलतं, त्याकडे दुर्लक्ष कर… निंदा करणार्‍यांना करू दे… तू तुझ्या कामात प्रामाणिक आहेस. कुटुंबीयांना सांभाळतोय. त्यांची काळजी घेतोय ना, मग कशाला उगीच टेन्शन घेतोस? तुझा हा अवगुण हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न कर. त्या दिशेनं वाटचाल कर. जमलं, तर चांगल्या ठिकाणी जाऊन समुपदेशन करून घे. पण नाराज होऊ नकोस…

हा संवाद ऐकला आणि मी माझ्या इच्छितस्थळी रवाना झालो. परंतु ती चर्चा माझ्याही मनात घर करून गेली, हे मात्र खरं. बरं त्या दोघांत ज्या अवगुणावर चर्चा सुरू होती ती जरा एका युवकाची त्याच्यापुरतीच सीमित खासगी बाब होती. मात्र, ती सर्वांना समजल्याने सार्‍यांकडून त्याला त्याबाबतीतच टक्के-टोमणे ऐकवणं सुरू असल्याने तो युवक जरा बेचैन झाला असावा… त्यामुळे माझ्यासारख्या संवेदनशील माणसाला त्या युवकाच्या बाजूने विचार करण्यास भाग पाडले. अनेक मित्र हे मित्रांचा घात करणारे असतात, तर अनेक जण मित्राचं कल्याण व्हावं, त्याच्या आयुष्यात सर्व काही मंगल-कुशल व्हावं, असा विचार करणारेच असल्याचेही आपण पाहात आहोत. त्यातील मित्राचं चांगलं व्हावं, असं दर्शवणारा हा प्रसंग मला भावला. एका मित्राला त्याच्या एका अवगुणामुळे सर्वत्र त्याची होणारी हाडहाड दूर सारण्यासाठी आणि त्याला सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम दुसर्‍याने केलं, हे पाहून ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’ या अनंत राऊत या कवीच्या ओळी सहजच स्मरून गेल्या. असो, समाजात आजही आपल्या आसपास अनेक लोक आपण पाहतो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्या ओळखीतील अनेकांमधे चांगले आणि वाईट गुण भरले आहेत. अनेक लोक उत्तम कार्य करून समाजात वेगळी छाप पाडत आहेत, तर अनेक जण चांगले काम करून नोकरीच्या ठिकाणी प्रामाणिकपणे सेवा देत आहेत. कुटुंबही उत्तमरीत्या सांभाळत आहेत. मात्र, लोकांमधील एखाद्या अवगुणावरच जास्त चर्चा केली जाते आणि संबंधितास जणू त्याने देशद्रोह वगैरे केल्याच्या भावनेतूनच इतरांकडून वागणूक दिली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे सामाजिक भान राखून प्रत्येक माणसाने ज्याच्याकडे जे चांगले गुण आहेत, जो चांगले कर्म करत आहे, त्यावर जर लक्ष केंद्रित केलं आणि त्या माणसातील एखाद्या अवगुणाकडे थोडंसं दुर्लक्ष केलं की, जगणं कसं सुलभ होईल नाही का? ‘कुछ पाने के लिए कुछ खोना पडता हैं’ असं आपण म्हणतोच ना? तर मग चांगल्या भविष्यासाठी आणि एखाद्याच्या आनंदासाठी त्याच्या एखाद्या दुर्गुणाला बाजूला होऊन त्या माणसाशी प्रेमानं वागलं, तर सर्वकाही लखलखीत शुभ्र वस्त्रासारखं दिसेल नाही का..?

हेही वाचा:

The post थोडं दुर्लक्ष करूया appeared first on पुढारी.