दत्त जयंती – 2022 : “अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त” जयघोषात समर्थ केंद्रामध्ये श्रीदत्त जन्मोत्सव

दत्तजयंती www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रधान केंद्र तसेच त्र्यंबकेश्वरचे श्री स्वामी समर्थ गुरुपीठ आणि देश आणि विदेशातील हजारो समर्थ केंद्रामध्ये बुधवारी (दि.7) अमाप उत्साहात, भावपूर्ण, मंगलमय वातावरणात श्रीदत्तात्रेय जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दुपारी बरोबर 12 वाजून 39 मिनिटांच्या मुहूर्तावर ” अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ” असा जयघोष करत श्री दत्तात्रेय जन्माचा आनंद व्यक्त करण्यात आला.

मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेस संपूर्ण भारतभर श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. करोडो भारतीयांच्या दृष्टीने हा दिवस म्हणजे एक भावभक्तीचा आनंद सोहळा असतो. गेल्या एक आठवड्यापासून हजारो समर्थ केंद्रावर श्री दत्तजयंती सप्ताहाची लगबग दिसून येत होती. या सप्ताहाच्या निमित्ताने हजारो केंद्रात लाखो अबालवृद्ध सेवेकऱ्यांनी श्रीगुरुचरित्र पारायणासह विक्रमी सेवेत सहभाग नोंदवला. तसेच बुधवारी (दि.7) पहाटेपासून सर्व समर्थ केंद्रावर श्रीदत्त जन्म सोहळ्याची लगबग सुरु होती. सकाळी आरतीची व इतर सेवा रुजू झाल्यावर दुपारी श्रीगुरुचरित्रातील चौथ्या अध्ययाचे वाचन सुरु करण्यात आले. त्यानंतर सेवेकऱ्यांनी “अवधूत चिंतन ” चा जयघोष करत आनंद व्यक्त करत आरती केली. दिंडोरी येथे उपस्थित देशभरातून प्रातिनिधिक स्वरूपात आलेल्या सेवेकरी, भाविकांशी गुरुमाऊली प. पू. अण्णासाहेब मोरे तर त्र्यंबकेश्वर गुरुपीठात चंद्रकांतदादा मोरे यांनी हितगुज केले. श्रीगुरुचरित्र ग्रंथाचे महत्व गुरुमाऊलींनी स्पष्ट केले. दिवसभरात आलेल्या हजारो सेवेकरी, भाविकांनी  महाप्रसादाचा लाभ घेतला. दिवसभर शहरी व ग्रामीण भागातील भाविकांनी समर्थ केंद्रावर हजेरी लावून सोहळ्यात हजेरी लावून दर्शन व आशीर्वाद घेतले. सोहळ्यात वेदमूर्ती गणपती व विजयअप्पा शिखरे यांनी हजेरी लावली तर मुकुंद कुलकर्णी यांनी  सूत्रसंचालन केले.

“आज आपल्या दृष्टीने अत्यंत परमपावन, चैतन्यदायी दिवस आहे. आज सर्व भारतीयांना चैतन्य पुरवठा करणाऱ्या, कायम आपल्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या श्रीदत्त महाराजांचा जन्मसोहळा आहे. श्रीदत्त महाराजांनीच श्री स्वामी समर्थ रूपात देशभर कार्य केले. श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या माध्यमातून देश आणि समाजासाठी अथकपणे काम सुरु आहे. कृषी, विवाह मेळावे समाजासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. बालसंस्कार, भारतीय संस्कृती व अस्मिता, दुर्गाभियान, यज्ञ, वास्तुशास्त्र, मानवी समस्या, नैसर्गिक आपत्ती निवारण, कर्ज निवारण, विविध आजारावर मात यासाठी मार्गदर्शन,असं विविध स्वरूपाचे कार्य आज जगभर सेवेकरी करीत आहेत.” – गुरुमाऊली प. पू. अण्णासाहेब मोरे.

भारताबाहेरही साजरा झाला दत्त जन्मोत्सव सोहळा 

दिंडोरी, त्र्यंबकेश्वरसह दत्त जन्मोत्सव सोहळा संपूर्ण राज्य व राज्याबाहेर जवळपास 21 राज्यांमध्ये तसेच भारताबाहेर अमेरिका, इंग्लंड, ओमान, दुबईसह अनेक देशांमधील महानगरातही साजरा झाला. विशेषतः बोस्टन, न्यू जर्सी, न्यूयार्क, डेट्रोईट, डल्लास, अटलांटा, रैले, सैन जोस, लॉस एंजलीस या महानगरामध्ये नव्यानेच सुरु झालेल्या केंद्रात सेवेकऱ्यांनी जन्मोत्सव सोहळा साजरा केला.

हेही वाचा:

The post दत्त जयंती - 2022 : "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त" जयघोषात समर्थ केंद्रामध्ये श्रीदत्त जन्मोत्सव appeared first on पुढारी.