दत्त जयंती – 2022 : “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा”

एकमुखी दत्तमंदिर www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अभिषेक, पूजा, पालखी, भजन, कीर्तन, महाआरती, पालखी अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी दत्तजयंती साजरी करण्यात आली. यावेळी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा गजर करण्यात आला. पहाटेपासूनच विविध कार्यक्रमांची सुरुवात झाल्याने शहर व परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी विविध मंदिरांमध्ये भाविकांनीदेखील दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. भाविकांना प्रसाद वाटपही यावेळी करण्यात आले.

रविवार कारंजा येथील एकमुखी दत्तमंदिर हे पुरातन मंदिर असल्याने याठिकाणी दर्शनासाठी भाविकांची दरवर्षीच मोठी गर्दी होत असते. यंदादेखील भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी याठिकाणी गर्दी केली होती. मंदिरात पूजा, अभिषेक आणि दत्तजन्मोत्सव पुजारी मयूर बर्वे आणि एकमुखी दत्तछंद भक्तपरिवार यांच्या उपस्थितीत झाला. गोदाघाटावरदेखील दत्तजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पालखीदेखील काढण्यात आल्याने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. पेठ फाटा येथील एरंडवाडीत दत्तमंदिरात सकाळी अभिषेक व पूजा करण्यात आली. भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. आडगाव शिवारातील वृंदावननगर येथील गार्डन काउंटी सोसायटीच्या समोरील उद्यानेश्वर मंदिरात दत्तजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

 

पालखी www.pudhari.news
नाशिक : दत्तजयंतीनिमित्त गोदाघाटावर पालखी काढण्यात आल्याने भक्तिभावाने दर्शन घेतांना भाविक. (छाया:हेमंत घोरपडे)

त्याचबरोबर नांदूर परिसर व तपोवनातील जनार्दनस्वामी आश्रमातदेखील दत्तजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पंचवटी पोलिस स्टेशनमधील दत्तमंदिरातदेखील पूजा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. दिवसभर शहरातील विविध भागांमध्ये दत्तजयंतीनिमित्त कार्यक्रमांची रेलचेल तसेच दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून आली.

भाविकांसाठी महाप्रसाद

सुयोजित संकुल परिसरात असलेल्या दत्तमंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. सकाळच्या सुमारास याठिकाणी पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर दिवसभर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

हेही वाचा:

The post दत्त जयंती - 2022 : "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" appeared first on पुढारी.