दिलीप प्रभावळकर : अभिनेता म्हणून प्रसिद्धी तर लेखनामुळे व्यक्त होण्याची ऊर्मी

दिलीप प्रभावळकर www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुळात माझी साहित्यिकाची बैठक नाही. मी एक भुरटा लेखक आहे. जो निमित्ताने लेखन क्षेत्रात आला. अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळाली पण लेखनामुळे स्वत:ला व्यक्त होण्याची ऊर्मी मिळाली. मी लिहू शकेन, असा अजूनही मला आत्मविश्वास वाटत नाही. संपादक, प्रकाशकांनी माझ्यावर विश्वास टाकला म्हणून माझ्या लेखन प्रवासाला सुरुवात झाली.

दिग्दर्शकाचा नट आणि संपादकाचा लेखक या प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेता आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांनी सांगितले. निमित्त होते सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताह व वार्षिक समारंभाचे. मु. शं. औरंगाबादकर सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात लेखिका, अनुवादक अपर्णा वेलणकर, प्रा. अनंत येवलेकर यांनी ही मुलाखत घेतली. वडिलांविषयी विचारलेल्या प्रश्नावर प्रभावळकर म्हणाले, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला माणसे भेटत गेली. ज्यामुळे मी स्वत:ला सावरू शकलो. रत्नाकर मतकरी, जयवंत दळवी, पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर यासारखी माणसे भेटत गेली. पण या सर्वांत पहिले माझे वडील होते. ज्यांनी मला लेखक आणि अभिनेता म्हणून काम करायला प्रवृत्त केले. आम्हा दोघांना पुस्तक छापायचे म्हणजे काय? हे माहिती नव्हते. त्यांनी अभिनेता आणि लेखक म्हणून काम करायला प्रोत्साहन दिले. त्यांनी माझा कल ओळखला होता त्यामुळे पूर्ण वेळ अभिनेता आणि पार्ट टाइम लेखक होऊ शकलो. विनायक चासकर आणि रत्नाकर मतकरी यांच्यामुळे माझ्यातली स्वत:ला शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली. गंगाधर टिपरे स्वत: लिहून त्यात अभिनय केला. त्या मालिकेच्या साधेपणामुळे ती मालिका लोकप्रिय झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, वैद्य विक्रांत जाधव, डॉ. धर्माजी बोडके, संजय करंजकर, जयप्रकाश जातेगावकर, सुनील कुटे उपस्थित होते. गिरीश नातू यांनी प्रास्ताविक, देवदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
आजचा कार्यक्रम : न्यायमूर्ती माधव जामदार
(मुंबई उच्च न्यायालय) यांचे ‘भारतीय राज्य घटनेला अभिप्रेत असलेला न्याय’ या विषयावर व्याख्यान.

हेही वाचा:

The post दिलीप प्रभावळकर : अभिनेता म्हणून प्रसिद्धी तर लेखनामुळे व्यक्त होण्याची ऊर्मी appeared first on पुढारी.