दिवाळी बोनसचे स्मार्ट प्लॅनिंग

उद्यम www.pudhari.news

उद्यम : सतिश डोंगरे

दिवाळी ‘बोनस’चा जन्म कसा झाला, याची कथा तशी रंजक आहे. इंग्रजांनी सुरू केलेली ही पद्धत वर्षाच्या 13व्या पगाराची फलश्रुती आहे. 30 जून 1940 पासून सुरू झालेली ही पद्धत आजही कामगारांसाठी पर्वणी ठरत आहे. वास्तविक वर्षातून एकदाच बोनस मिळतो. मात्र, त्यासाठी कामगारांमध्ये असलेली उत्सुकता कमालीची असते. दिवाळीत मिळणार्‍या या बोनसच्या पैशांचे अगोदरच नियोजन केले जाते. विशेषत: खरेदीवरच हा पैसा खर्च केला जातो. यंदा सर्वच क्षेत्रांतील कामगारांना समाधानकारक बोनस दिले गेले. मात्र, यंदा शॉपिंगपेक्षा लाभदायी गोष्टींसाठी बोनसच्या पैशांचा वापर कामगारांकडून केला जाणार आहे.

कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात उद्योग क्षेत्र सर्वाधिक भरडले गेले. पर्यायाने याची मोठी झळ कामगारांनाही बसली. या काळात अनेकांना पगार दिले गेले नाही, कित्येकांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. त्यामुळे हा काळ अनेकांसाठी कसोटीचा ठरला. घराचे हप्ते, मुलांच्या शाळा, दवाखाना, कुटुंबप्रमुख म्हणून घराची जबाबदारी अशा सर्वच समस्यांच्या गर्तेत कामगार सापडला गेला. अर्थात मालकवर्गही या काळात हतबल झालेला दिसून आला. कालांतराने कोरोना संसर्ग कमी झाला अन् पुन्हा एकदा उद्योग क्षेत्राच्या चाकांनी गती घेतली. अनेक कंपन्यांनी आपल्या कामगारांना पुन्हा कामावर रुजू करून घेतले. पगार पूर्ववत केले. काही कंपन्यांमध्ये पगारवाढही दिली गेली. अशात यंदाच्या दिवाळीला विशेष महत्त्व आले आहे. तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा भरमसाट बोनसच्या चर्चा औद्योगिक वसाहतीत रंगत आहेत. अर्थात याचा आनंद जरी कामगारांना असला, तरी कोरोना काळाने निर्माण केलेली आर्थिक कोंडी दूर करण्यावर कामगार यंदाच्या बोनसचा वापर करणार आहेत. अनेकांनी बोनसच्या पैशांचा वापर स्मार्टपणे करण्यावर भर दिला आहे. कोरोना काळात काढलेले वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज, क्रेडिट कार्डचे बिल बोनसरूपाने एकरकमी मिळालेल्या पैशातून परतफेड करण्यावर भर दिला जात आहे. काहींनी आरोग्य विमा आणि आयुर्विम्याचे थकलेले हप्ते भरण्यासाठी विचार केला आहे. कोरोनाच्या कटू आठवणी लक्षात घेऊन काहींनी बोनसच्या रकमेचा वापर म्युच्युअल फंडात एकरकमी गुंतवणूक करण्यासाठीही केला आहे. एकूणच यंदाच्या दिवाळीत भरघोस बोनस मिळाला असला, तरी त्याचा सदुपयोग करण्यावर कामगार सध्या भर देताना दिसत आहेत. नाशिक औद्योगिक वसाहतीतील बहुतांश कंपन्यांनी सध्या आपला बोनस जाहीर केला आहे. नेहमीप्रमाणेच महिंद्रा, सीएट या मोठ्या कंपन्यांनी आपल्या कामगारांना भरघोस बोनस दिला आहे. इतर कंपन्यांनीदेखील कामगारांना बोनसच्या रूपातून सुखद दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. अशात कामगारांनी यंदाचा बोनस आर्थिक स्थैर्य प्राप्तीसाठी वापरण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह म्हणावा लागेल. शिवाय दोन वर्षांत कर्जाचे ओझे घेऊन जे कामगार वावरत होते, ते ओझे या दिवाळीनिमित्त खाली उतरविले जाणार असल्याने यंदाची दिवाळी खर्‍या अर्थाने कामगारांसाठी गोड ठरणार आहे. केवळ कामगारच नव्हे, तर कुटुंबातील प्रत्येक सदस्यांसाठी कर्जातून मुक्त झाल्याचा आनंद प्राप्त करून देणार आहे.

हेही वाचा:

The post दिवाळी बोनसचे स्मार्ट प्लॅनिंग appeared first on पुढारी.