दीपोत्सव : मिठाई दुकानदारांना ठोठावला 19 हजारांचा दंड

mithai www.pudhari.news

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर देवळाली कॅन्टोन्मेंट हद्दीतील मिठाई दुकानांची लष्कराच्या कॅन्टोन्मेंट आरोग्य विभाग व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने तपासणी करत 10 दुकानांतील मिठाईचे नमुने मुंबईत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. तीन दुकानांमध्ये स्वच्छतेबाबत त्रुटी आढळल्याने त्यांना कॅन्टोन्मेंट प्रशासन नोटिसा बजावण्यात आल्या. तसेच प्लास्टिक वापराबद्दल दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करत 19 हजार रुपये दंडाची वसुली करण्यात आल्याचे आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता यांनी सांगितले.

लष्कराचे स्टेशन हेल्थ ऑर्गनायझेशनचे आरोग्य अधिकारी कर्नल ए. डॅनियल, आरोग्य अधीक्षक संजय ठुबे आदींसह राज्य शासनाचे अन्नसुरक्षा अधिकारी गोपाल कासार तसेच कॅन्टोन्मेंटचे आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता, निरीक्षक शिवराज चव्हाण, अतुल मुंडे, शाजेब सय्यद, पर्यवेक्षक विनोद खरालिया यांनी सहभाग घेत शहरातील विविध मिठाई दुकानांची तपासणी केली. दूध, दुधापासून बनवलेल्या व अन्य प्रकारच्या मिठाईसह पाण्याचे नमुने तपासण्यात आले. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या ‘अन्नसुरक्षा व अनुपालन प्रणाली’च्या आधारे मिठाईचे नमुने ताब्यात घेत तपासणीसाठी ते मुंबई कार्यालयाकडे पाठविण्यात आले. याशिवाय ज्या तीन दुकानदारांनी स्वच्छतेबाबत दुर्लक्ष केले त्यांना तातडीने नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्या सूचनांची पूर्तता करण्याचे आदेश कर्नल ए. डॅनियल यांनी कॅन्टोन्मेंट प्रशासनास दिले आहेत. पुढील आठ दिवसांत पुन्हा मोहीम राबविली जाणार आहे. यावेळी अन्नसुरक्षा अधिकारी गोपाल कासार यांनी मिठाई दुकानदार सुधीर गुप्ता, उद्धव उभ्रानी, योगेश सावंत, जुबिन शाह, अनिल चावला, दीपक यादव आदींशी संवाद साधला व स्वच्छतेबाबत सूचना दिल्या.

हेही वाचा:

The post दीपोत्सव : मिठाई दुकानदारांना ठोठावला 19 हजारांचा दंड appeared first on पुढारी.