देशसेवेच्या ध्यासातून नाशिकच्या प्रणवची पायलट पदाला गवसणी

नाशिक,www.pudhari.news

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा

कातळगावचा प्रणव जोपळे प्रशिक्षण घेऊन लढाऊ विमानाचा वैमानिक झाला असून, लवकरच तो हवाईदलात दाखल होईल. त्याच्या या यशाने नाशिक जिल्ह्याचे नाव पुन्हा उंचावले आहे. खडतर परिस्थितीतही यश मिळवता येते, याचा परिपाठ तरुणाईस घालून दिला आहे.

सप्तश्रृंगीदेवी परिसरातील डोंगररांगेत कातळगाव आहे. या डोंगररांगेतच मोहनदरी आश्रमशाळा आहे. मोहनदरी व परिसरातील अनेक जण वैद्यकीय अधिकारी, अभियंता या पदावर कार्यरत आहेत. याचाच कित्ता गिरवत तारामती जोपळे व राजू जोपळे या शिक्षक दाम्पत्याचा प्रणव या मुलाने लढाऊ वैमानिक पदाला गवसणी घालत उराशी बाळगलेले देशसेवेचे स्वप्न सत्यात उतरविले आहे.

प्रणवचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण नाशिकला झाले. त्याने अकरावीपासूनच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसाठीचा अभ्यास सुरू केला होता. संरक्षण दलातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत दोन वेळा गुणवत्ता यादीत आला आहे. म्हैसूर येथे वैद्यकीय चाचणी व मुलाखतीनंतर खडकवासला येथील अकादमीत तीन वर्षे खडतर प्रशिक्षणानंतर हैदराबाद येथे एक वर्ष हवाईदलाच्या अकादमीत प्रशिक्षण घेऊन उड्डाण अधिकारी बनला आहे. संरक्षणमंत्री, संरक्षण दलाचे उच्च अधिकारी व आई-वडिलांच्या उपस्थितीत नुकतीच त्याला उड्डाण अधिकारी ही पदवी बहाल करण्यात आली आहे. प्रणव सध्या बिदर येथे देशसेवा बजावत आहे. आपल्या यशात मोठा भाऊ प्रशांत, बहीण प्रियंका, आहिरराव, कप्तान नीलेश खैरनार यांचा वाटा असल्याचे प्रणव सांगतो.

हेही वाचा :

The post देशसेवेच्या ध्यासातून नाशिकच्या प्रणवची पायलट पदाला गवसणी appeared first on पुढारी.