देशात होणारे धर्मांतरणाचे षडयंत्र हाणून पाडा : योगगुरु रामदेवबाबा

रामदेव बाबा,www.pudhari.news

जळगाव : हिंदू समाजाने कुणासोबतही भेदभाव केलेला नाही, आम्ही भेदभाव केला असता तर कुठलेही धर्मिय एक पाऊलसुध्दा ठेऊ शकले नसते. आम्ही सहिष्णू आहोत, सर्वांना येथे स्थान दिले आहे. मात्र धोका करुन औरंगजेबपासून अनेक क्रुर शासकांनी जबरीने धर्मांतरण घडवून आणले. आजही तिच क्रुरता यांच्यात दिसून येते. एक श्रध्दाला जाळ्यात ओढून तिचे ३५ तुकडे केले. अशा विधर्मींना आता आमच्या माता-बहिणींसोबत काही वाईट करण्याची एकही संधी देऊ नका, असे आवाहन योगगुरु रामदेवबाबा यांनी केले.

जामनेर तालुक्यातील गोद्री येथे हिंदू गोर बंजारा – लबाना -नायकडा समाज कुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी आपले मनोगत व्यक्त करताना रामदेवबाबा बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, द्वारकापीठाचे शंकराचार्य उपस्थित आहेत. कुंभात महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात आदी राज्यांतून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत.

धर्मांतराचे षडयंत्र हाणून पाडा…

जगाच्या इतिहासात काहींनी आपले साम्राज्य पसरवले. यांचे हात रक्ताने माखलेले आहेत. औरंगजेबाचे वंशज आता भिक मागत आहेत. धर्माच्या नावावर ज्या मुघलांनी क्रुरता केली त्यांचे वंश संपले. त्यांच्यापेक्षा जास्त कपटी ईसाई आहेत. ते आमच्या घरात मदतीच्या बहाण्याने घुसतात. दवाखाने आणि शाळांच्या माध्यमातून धर्मांतर घडवून आणतात. त्यामुळे बंजारा समाजाने शपथ घ्यावी कुठलेही प्रलोभनास बळी न पडता धर्माचा त्याग करणार नाही. आम्ही श्रीराम-कृष्ण आणि संतांचे वंशज आहेत. आम्ही बदलणार नाहीत, जे धर्म सोडून गेले त्यांना पुन्हा घरवापसी करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे, असेही रामदेवबाबा म्हणाले.

हिंदुधर्म शास्वत, सनातन…

हिंदूधर्म केवळ राष्ट्रधर्म नाही, तर हिंदुधर्म विश्वधर्म एक युगधर्म आहे. सनातन म्हणजे नित्य, शास्वत धर्म आहे. त्याला कुठलिही शक्ती मिटवू शकत नाही. ज्याप्रमाणे कुणी अग्नी, जल, वायु आणि पृथ्वीचा धर्म बदलू शकत नाही, त्याचप्रमाणे कुणीही हिंदूधर्म बदलू शकत नाही हे शास्वत सत्य आहे. ईस्लाम आणि ईसाई यांच्यात काही चांगल्या गोष्टी आहेत. मी कुठल्याही धर्माची निंदा करत नाही. हिंदु धर्मात चार वेद, सहा दर्शन, उपनिषद, १८ पुराण असे १ लाखांहून अधिक धार्मिक ग्रंथ आहेत. ज्या धर्माचा एवढा मोठा सांस्कृतिक ठेवा आहे. ब्रम्हांडातील सर्व विषय ज्ञान, विज्ञान आमच्या ग्रंथात आहेत. याचा आपल्याला गौरव असला पाहिजे, असेही रामदेवबाबा म्हणाले.

एकजुटीने समाजाचा विकास करा…

भारतातील एकही व्यक्ती आपल्या इच्छेने मुस्लिम बनला नाही, तर जबरजस्तीने मुस्लिम बनवले आहे. आता त्यांना पुन्हा आपल्या धर्मात घेण्याची गरज आहे. आपसातील सर्व भेदभाव विसरुन समस्त हिंदू समाजाने एकजूट होण्याची गरज आहे. एकमेकांच्या संकटात मदतीसाठी धावून जाणे हाच आपला धर्म आहे. आम्हाला ईसाईंच्या भीकेवर पुढे जायचं नाही, तर संघर्ष करुन पुढे जायचं आहे. पुरुषार्थ करुन आपला विकास करण्याचे आवाहन रामदेवबाबा यांनी केले.

हेही वाचा :

The post देशात होणारे धर्मांतरणाचे षडयंत्र हाणून पाडा : योगगुरु रामदेवबाबा appeared first on पुढारी.