दै. पुढारी विशेष : क्रीडा प्रबोधिनीच्या खेळ संख्येत वाढ: स्वतंत्र प्रशिक्षकामार्फत मिळणार धडे

ॲथलेटिक्स www.pudhari.news

नाशिक : नितीन रणशूर

आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये खेळाचे गुण उपजत असतात. त्यांना जर योग्य संधी व सुविधा मिळाल्या तर ते क्रीडा क्षेत्रात देशाचे नाव जागतिक स्तरावर गाजवू शकतात, हे आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिने दाखवून दिले आहे. सांघिक प्रकारापेक्षा वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदके मिळविण्याची संधी जास्त असल्याने आदिवासी क्रीडा प्रबोधिनीने खेळांच्या संख्येत वाढ केली आहे. त्यामुळे ८ ते १२ वयोगटांतील आदिवासी खेळाडूंना सांघिकसोबत वैयक्तिक क्रीडा प्रकाराचे धडे मिळणार आहेत.

आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये उत्तम कलागुण, बौद्धिक क्षमता आहे. या मुलांच्या क्रीडा गुणांना चालना देणे व क्रीडाविषयक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील पहिली आदिवासी क्रीडा प्रबोधिनी नाशिकमध्ये सुरू करण्यात आली आहे. या प्रबोधिनीतून आदिवासी खेळाडूंना कबड्डी, खो-खो आणि ॲथलेटिक्सचे प्रशिक्षण दिले जाते. त्यात कबड्डी व खो-खोसाठी १२ वर्षांखालील मुले-मुली प्रत्येकी १२ तर ॲथलेटिक्ससाठी मुले-मुली प्रत्येकी पाच अशा एकूण ५८ खेळाडूंना नियमित प्रशिक्षण दिले जाते.

आदिवासी युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा व काटकता असते, धावणे, पोहणे, लांब, उंच उडी आणि नेमबाजीसह विविध क्रीडा प्रकारांचे कौशल्य नैसर्गिकरीत्या असते. त्यामुळे आदिवासी क्रीडा प्रबोधिनीत नव्याने आठ क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात कनो-कायाकिंग, नेमबाजी, जिम्नॅस्टिक्स, कुस्ती, धनुर्विद्या, बॉक्सिंग, स्विमिंग आदी समावेश आहे. या वैयक्तिक क्रीडा प्रकारात खेळानुसार स्वतंत्र प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच त्यांच्या दर्जेदार व पोषक आहारावरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. दरम्यान, क्रीडा प्रबोधिनी परिसरात वसतिगृहाच्या सुविधा असणार आहेत. तसेच या खेळाडू विद्यार्थ्यांना डीबीटीसह शाळेत जाण्या-येण्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वैयक्तिक तसेच सांघिक खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडांगणांमध्ये अद्ययावत क्रीडा साहित्याद्वारे उत्तम दर्जाच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करता येणार आहे. मात्र, प्रबोधिनीत सामील होण्यासाठी खेळाडूंना मैदानी चाचणी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. त्यातून १०० खेळाडूंची अंतिम निवड होणार असून, त्यात मुले-मुलींची संख्या समसमान असणार आहे.

क्रीडा प्रकारानुसार विद्यार्थी संख्या
खेळ प्रकार-                 विद्यार्थी संख्या
कबड्डी-                             २४
खो-खो-                              २४
ॲथलेटिक्स-                       १०
कनो-कायाकिंग-                  ०४
नेमबाजी-                           ०८
जिम्नॅस्टिक्स-                    ०६
कुस्ती-                               ०८
धनुर्विद्या-                         ०६
बॉक्सिंग-                           ०४

क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून आदिवासी खेळाडूंना शालेय, राज्य व राष्ट्रीय स्तरावर वैयक्तिक तसेच सांघिक खेळांमध्ये सहभागी होता येणार आहे. त्यांना प्रशासकीय सेवेतील खेळाडू कोट्यातून आरक्षण मिळू शकते. त्यामुळे पात्र आदिवासी खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात करियरची संधी उपलब्ध होणार आहे. -जितिन रहमान, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक.

हेही वाचा:

The post दै. पुढारी विशेष : क्रीडा प्रबोधिनीच्या खेळ संख्येत वाढ: स्वतंत्र प्रशिक्षकामार्फत मिळणार धडे appeared first on पुढारी.