धुळे : अतिवृष्टीमध्ये मदत न दिल्यामुळेच शेतकरी आत्महत्येमध्ये वाढ – अंबादास दानवे 

अंबादास दानवे

धुळे : पुढारी वृत्तसेवा

अतिवृष्टीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याला राज्यातील सरकारने आश्वासनापलीकडे कोणतीही मदत दिली नाही. अतिवृष्टी झाल्याबरोबर त्वरीत मदत मिळाल्यास शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्या. त्यामुळे हे सरकार आणखी किती आत्महत्या होण्याची वाट पाहत आहेत, असा प्रश्न विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. मेहबूबा मुफ्तीच्या हातातील कमळापेक्षा काँग्रेसच्या हातातील मशाल बरी, अशी टीका देखील त्यांनी भारतीय जनता पार्टीवर यावेळी केली.

धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे आगमन झाले होते. यावेळी त्यांनी पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांबरोबर संवाद साधल्यानंतर पत्रकारांसमोर भूमिका मांडली. यावेळी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी, संघटक भगवान करनकाळ, धिरज पाटील, माजी आमदार शरद पाटील, डॉक्टर सुशील महाजन, किरण जोंधळे,कैलास पाटील, भरत मोरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र आता ते शेतकऱ्यांचे हित विसरले आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आहे. धुळे जिल्हा देखील त्याला अपवाद नाही. अतिवृष्टीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. मात्र या कालावधीत राज्यातील सरकारने केवळ तीन हजार चारशे कोटी रुपयांची मदत जाहीर केली. प्रत्यक्षात ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही. अतिवृष्टी झाल्याबरोबर ही मदत पोहोचली असती तर शेतकरी आत्महत्या कमी होण्यास मदतच झाली असती. त्यामुळे सरकार आणखी किती शेतकरी आत्महत्या होण्याची वाट पाहत आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज्यातील सरकार बुलेट ट्रेन करणे, शिवसेनेवर खोटे गुन्हे दाखल करणे, बदला घेणे आणि महाविकास आघाडीने मंजुरी दिलेल्या कामांना स्थगिती देणे, एवढेच काम करते आहेत. राज्यातील हे सरकार स्थगिती सरकार असल्याचा टीका देखील त्यांनी केली आहे. राज्यातील ग्रामविकास विभागाने ग्रामीण भागाच्या विकासासाठी मंजूर केलेल्या सर्व कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आता विकास कामे थांबले आहेत.

धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे केवळ फोडाफोडीचे राजकारण करण्यासाठी धुळ्यात येतात. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे देणे घेणे नाही. सत्तेचा माज सरकारमधील मंत्र्यांना असल्याची टीका देखील दानवे यांनी केली .पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नाही. यातील सरकारच्या वाटेची रक्कम देखील शेतकऱ्यांमध्ये समान पद्धतीने वाटली गेली पाहिजे. असा बीड पॅटर्न राबवण्याची मागणी केंद्राकडे केली .मात्र केंद्र सरकारने मध्य प्रदेशात या योजना राबवण्यास सुरुवात केली .महाराष्ट्रासाठी ही योजना राबवली गेली नाही. त्यामुळे केंद्र सरकार देखील विमा कंपनीला धार्जीने आहेत काय, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. मशालच्या चिन्हावर भारतीय जनता पार्टी कडून झालेल्या टीकेला उत्तर देताना दानवे यांनी सांगितले की, मेहबूबा मुफ्ती यांच्या हातातील कमळापेक्षा काँग्रेसच्या हातामधील मशाल बरी असा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा:

The post धुळे : अतिवृष्टीमध्ये मदत न दिल्यामुळेच शेतकरी आत्महत्येमध्ये वाढ - अंबादास दानवे  appeared first on पुढारी.